दिल्ली: रायगड विकास प्राधिकरण मार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या जतन व संवर्धन कार्यांसंदर्भात दिल्ली येथे भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांची छत्रपती संभाजीराजे यांनी बैठक घेतली.
बैठकीत रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुढील मुद्दे मांडले :
1. ऐतिहासिक लाईट एंड साउंड शो ला मान्यता:
रायगड किल्ल्याच्या ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी तसेच पर्यटकांना उत्कृष्ट अनुभव मिळावा यासाठी लाईट अँड साऊंड शो सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी.
2. मुख्य व उपक्षेत्रांची व्याख्या:
गडावरील मुख्य व उपक्षेत्र (Core आणि Peripheral Area) निश्चित करून, बाजारपेठ, मनोरे आणि जगदीश्वर मंदिर या वास्तू पुरातत्व विभागाकडे मुख्य क्षेत्रात संवर्धनासाठी ठेवाव्यात, तर उपक्षेत्रातील इतर संरचनांचे संवर्धन रायगड विकास प्राधिकरण मार्फत ASI च्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावे.
3. मुख्य स्मारकांचे फसाड लाइटिंग:
रायगड किल्ल्यावरील प्रमुख स्मारकांना फसाड लाइटिंग करण्यासाठी मान्यता द्यावी.
4. संवर्धन कामांसाठीच्या साहित्य वाहतुकीसाठी रोपवे:
गडावरील संवर्धन आणि पुनर्रचना कामासाठी साहित्य वाहतुकीसाठी रोपवे उभारण्यास मान्यता देण्यात यावी, ज्यामुळे खर्च आणि तांत्रिक अडचणी कमी होतील.
5. पुरातत्त्व विभागामार्फत प्रमुख स्मारकांचे संवर्धन:
बालेकिल्ला, मनोरे, जगदीश्वर मंदिर आणि बाजारपेठ या प्रमुख ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन पुरातत्त्व विभागामार्फत त्वरित हाती घेण्यात यावे.
6. जिजामाता वाडा आणि समाधी संवर्धन:
जिजामाता वाडा आणि जिजामाता समाधी यांचे संवर्धन रायगड विकास प्राधिकरण मार्फत पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली करण्यात यावे.
यासंदर्भात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून सकारात्मक पाठबळ मिळेल अशी अपेक्षा आहे. रायगड किल्ल्याचा इतिहास आणि गौरवशाली वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.