जवाहर साखर कारखाना चेअरमनपदी कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हा.चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची फेरनिवड

कुंभोज:हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी बाबासो चौगुले यांची एकमताने निवड करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या सभेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही घोषणा केली.

 

 

 

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. मल्टीस्टेट को-ऑप.सोसायटीज् अ‍ॅक्टमधील तरतुदीनुसार सन 2024 ते 2029 या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडून द्यावयाच्या संख्येइतकेच अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

नवीन संचालक मंडळामध्ये सामान्य उत्पादक सभासद सर्वसाधारण गटातून सर्वश्री कल्लाप्पा बाबूराव आवाडे, प्रकाश कल्लाप्पा आवाडे, शितल अशोक आमण्णावर, सूरज मधुकर बेडगे, बाबासो पारिसा चौगुले, गौतम बाबूराव इंगळे, अभयकुमार भालचंद्र काश्मिरे, संजयकुमार भूपाल कोथळी, पार्श्‍वनाथ उर्फ सुनिल अशोक नारे, आदगोंडा बाबगोंडा पाटील, महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील (कुगे), प्रकाश बाळासो पाटील, सुनिल सातगोंडा पाटील, दादासो नरसू सांगावे असे 14 प्रतिनिधी, सामान्य उत्पादक सभासद महिला गटातून सौ. वंदना विजय कुंभोजे व सौ. कमल शेखर पाटील असे 2 प्रतिनिधी, सामान्य उत्पादक सभासद अनुसूचित जाती/जमाती गटातून प्रशांत महादेव कांबळे हे 1 प्रतिनिधी आणि सामान्य बिगर उत्पादक सभासद (सहकारी संस्था प्रतिनिधीसह) गटातून सर्वश्री आण्णासो गोपाळा गोटखिंडे व सुभाष बापूसो जाधव हे 2 प्रतिनिधी असे एकूण 19 संचालक आहेत.

नवनिर्वाचित संचालकांचा प्रमाणपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन फेटा बांधून अभिनंदन करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी उभारलेल्या आणि प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रातील आघाडीच्या या कारखान्याची संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध करून सभासद शेतकर्‍यांनी व्यवस्थापनावरील विश्‍वास अधिक दृढ केला आहे. कारखान्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतची सलग 8 वी निवडणूक बिनविरोध झाली असून या निवडणूकीमुळे कारखान्याची बिनविरोध निवडणुकीची परंपरा अधोरेखित केली आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली व सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक कार्यालय सहकारी संस्था कोल्हापूर सुनिल धायगुडे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.