कोल्हापूर जिल्ह्यातील 3452 मतदान केंद्रांपैकी 2090 मतदान केंद्रांवर वेबकास्टींग द्वारे निवडणूक विभागाची नजर ;जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून सनियंत्रण कक्षाची पाहणी

कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघातील 3452 मतदान केंद्रांवर दि.20 नोव्हेंबर रोजी होत आहे. सर्व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाकडून एकुण 3452 मतदान केंद्रांपैकी 2090 मतदान केंद्रांवर वेबकास्टीग द्वारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर सुरू असलेल्या प्रत्येक प्रक्रियेवर जिल्हास्तरावरून नजर ठेवण्यात येत आहे. तसेच या कॅमेऱ्यांच्या मतदतीने कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर विविध घटनांच्या तक्रारी येत असतात. त्यांची पाहणी करण्यासाठी, त्यांची शाहनिशा करण्यासाठी या कॅमेरांची मदत घेतली जाणार आहे. यामुळे मतदान प्रक्रियेवेळी होणाऱ्या गैर प्रकारांवर आपोपच आळा बसणार आहे. मुख्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी या सनियंत्रण कक्षाची वेळोवेळी येवून कामकाजाबाबत पाहणी करीत आहेत.

 

 

 

मतदान केंद्रातील निवडणूक प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून थेट पाहता येणार आहे. विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा मतदार संघातील एकूण मतदान केंद्रांच्या पन्नास टक्‍के केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्याचे नियोजन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे. याकरिता निवडणूक आयोगाने निश्चित केलेले निकष लावण्यात आले आहेत. एकाच इमारतीमध्ये जास्त मतदान केंद्र असल्यास त्या शाळेतील मतदान केंद्र, मागील निवडणुकीत जास्त मतदान झालेले मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, अशा विविध मतदान केंद्रांचा यामध्ये समावेश आहे. वेब कास्टिंगसाठी निवडण्यात आलेल्या मतदान केंद्रामध्ये मतदारांच्या मतदान गोपनियतेचा भंग होणार नाही, अशा पद्धतीने कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने केंद्रावर मतदान सुरू होण्यापूर्वीपासून ते मतदान संपेपर्यंतच्या सर्व घडामोडींचे चित्रीकरण होणार आहे.

चक्रीका ॲपचाही पारदर्शकतेसाठी उपयोग
मतदान कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या चक्रीका ॲपमुळे कर्मचारी नेमून दिलेल्या केंद्रावर वेळेत पोहचले नसेल किंवा काही अनुचित प्रकार अथवा घटना घडत असेल तर ते या ॲपच्या माध्यमातून त्वरित कळणार असून प्रशासनाला उपाययोजना करणे सोपे होणार आहे. चक्रीका ॲपमुळे कर्मचाऱ्यांचे लोकेशन निवडणूक आयोगाला शेअर होत असते. चक्रीका ॲपमुळे कर्मचाऱ्यांचे लाईव्ह लोकेशन ट्रेस केले जाणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्यांना चक्रिका अ‍ॅप डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे ‘चक्रीका’ अ‍ॅप 19 आणि 20 नोव्हेंबरला सुरू ठेवणे कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आले असून या अ‍ॅपमुळे मतदान केंद्रात गोंधळ झाल्यास ते प्रशासनाला तातडीने समजणार आहे.