महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील दहाही उमेदवारांसाठी ताकतीने काम करा : एम. बी. पाटील 

कोल्हापूर : पक्षाची ताकत तुमच्यासोबत असून दहाही विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी ताकतीने काम करण्याच्या सूचना काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिल्या.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघाचा पाटील यांनी काँग्रेस कमिटीत आढावा घेतला. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा करत त्यांची मते जाणून घेतली.

मंत्री पाटील म्हणाले, काँग्रेसच्या मूळ विचारधारेवर चालत असताना सर्व समाजाच्या, सर्व धर्माच्या वेगवेगळ्या विचारधारांचा आदर ठेवून काम करण्यावर भर द्या. पक्षाची ताकद तुम्हाला देतो, तुम्ही सर्व उमेदवारांना बळ द्या. यावेळी कोल्हापूर लोकसभेचे निरीक्षक आमदार हसन मौलाना, आंध्रप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आणि हातकणंगले लोकसभा निरीक्षक साके सैलजानाथ, कोल्हापूर उत्तर विधानसभेचे निरीक्षक सुखवंतसिंग ब्रार, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस दयानंद पाटील, शशांक बावचकर, सरलाताई पाटील, भारती पवार, संध्याताई घोटणे, तौफिक मुल्लानी, सुप्रिया साळोखे, जयसिंगराव हिरडेकर, भगवानराव जाधव, शिवाजीराव कांबळे, शामराव देसाई, शिवाजीराव पाटील, हिंदुराव चौगुले उपस्थित होते.

सभा, मदतीबाबत केली विचारणा

मंत्री पाटील यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, काँग्रेसचे उमेदवार आणि विरोधातील उमेदवार यांचीही माहिती घेतली. कोणत्या मतदारसंघात मोठ्या सभा घेणे गरजेचे आहे याची माहिती घेत त्यांनी पक्षाकडून काय सहकार्य अपेक्षित आहे याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.