आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी होण्यासाठी जिल्ह्यात निर्बंध लागू

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024 जाहीर झाला असून दिनांक 15 ऑक्टोबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे व प्रभावीपणे करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दिनांक 21 ऑक्टोबर 2024 पासून विधानसभा निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये खालील बाबींवर निर्बंध घातले आहेत.

 

 

निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊड स्पिकरचा वापर सकाळी 6 वाजण्यापूर्वी व रात्री 10 वाजल्यानंतर करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करता येणार नाही. मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या वेळेपासून 48 तास अगोदर लाऊड स्पिकरचा वापर करता येणार नाही. कोणत्याही उमेदवारास निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या ठिकाणाजवळ किंवा धार्मिक स्थळे, दवाखाने, शैक्षणिक संस्था, इ. सारख्या सार्वजनिक ठिकाणाजवळ तात्पुरते पक्ष कार्यालय उघडता येणार नाही.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदाना दिवशी मतदान केंद्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या ठिकाणी तसेच मतदान केंद्रापासून 100 मीटर परीसरात कोणत्याही व्यक्तिला खालील कृत्ये करता येणार नाहीत.

कोणत्याही स्वरुपात निवडणूक विषयक प्रचार करणे, मतदारांना धमकविणे, मतदारावर ठराविक उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव टाकणे. मतदाराने मतदानाचा हक्क बजावू नये यासाठी कोणत्याही मार्गाने दबाव टाकणे.
उमेदवाराचे चिन्ह दर्शविणारे नोटीस बोर्ड प्रदर्शित करणे. मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट किंवा तत्सम अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्याचा वापर करणे तसेच मतदान केंद्रामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करणे.

राज्याची अगर देशाची सुरक्षितता धोक्यात येईल अगर आदर्श आचारसंहिता भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे, चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करता येत नाही. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 127 (अ) मधील तरतुदींचा भंग होईल अशाप्रकारे कोणत्याही निवडणूक प्रचाराविषयक साहित्याची छपाई करता येणार नाही.

शस्त्र अधिनियम 1959 व शस्र नियम 1962 च्या तरतुदीखाली विशिष्ट परिस्थितीत संबंधित पोलीस निरीक्षक यांच्या पूर्वपरवानगीने (खासगी सुरक्षा वगळून) नॅशनलाईज्ड बँका, सहकारी तत्वावरील बँका, महत्वाची धार्मिक स्थळे, रायफल क्लब व त्यांचे अधिकृत मेंबर, औद्योगिक युनिट, पब्लिक एंटरप्राईजेस यांना अशी हत्यारे (व दारुगोळा) वाहतुक करता येईल, तथापि हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावत असलेल्या शासकीय कर्मचा-यांना (पोलीस अधिकारी व अंमलदार) यांना लागू राहणार नाही.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कालावधीत मोटारगाड्या, वाहने ही कोणत्याही परिस्थितीत 3 (तीन) पेक्षा अधिक वाहनाच्या ताफ्यात चालविण्यात येवू नयेत. मात्र हा आदेश सर्व मोठ्या संरक्षक गाडांच्या ताफ्यात तो केंद्र किंवा राज्य शासनाने किंवा कोणत्याही राजकीय व्यक्तिस घेवून जात असेल आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना झेडप्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली असेल तेव्हा त्यांच्या सुरक्षितते विषयी वापरल्या जाणा-या वाहनांच्या संदर्भात लागू राहणार नाही. निवडणूक विषयक प्रचाराच्या अनुषंगाने दि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपटी अॅक्ट 1995 मधील तरतुदीचा भंग होईल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करता येणार नाही. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 271 ते 280 विधानसभा मतदार संघात मतदार म्हणून नोंद नसलेल्या, मतदानाचा हक्क बजाविण्यास पात्र नसलेल्या राजकीय पक्षप्रमुख व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रिया पूर्ण होण्याच्या वेळेपासून 48 तासाच्या कालावधीत मतदारसंघात वास्तव्य करता येणार नाही.