सर्वांगसुंदर कागलला देशाच्या नकाशावर आणले : हसन मुश्रीफ

कागल : कागल येथे शेकडो विकासकामांच्या माध्यमातून शहरासह उपनगरांचा कायापालट झाला आहे. हे वैभव साकारण्याची संधी मला मिळाली आणि आपलं सर्वांगसुंदर बनलेलं कागल शहर देशाच्या नकाशावर आलेलं आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. कागल येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात हसन मुश्रीफ बोलत होतेत. अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते चंद्रकांत गवळी होते.

 

 

कागल शहरालगत असणाऱ्या श्रीमंत जयसिंगराव तलाव परिसरात अम्युजमेंट पार्क, धबधबा, बोटिंग क्लब, ऑक्सीजन पार्क, बगीचा असे अनेक उपक्रम नगरपालिकेच्या माध्यमातून राबवल्याने जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक सीमाभागातून हजारो पर्यटक येत आहेत. कागल शहरातील विकास कामांबरोबर येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी. पुतळे उभारले असून त्यांच्या असामान्य कार्याची प्रेरणा येथील तरुणांनी घ्यावी.

जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, ‘भले ते रक्ताचे वारसदार असतील मात्र मंत्री हसन मुश्रीफ हे विचारांचे खरे वारसदार आहेत. त्यांनी कागलच्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये प्रचंड मोठे उद्योगधंदे आणल्याने कागलचे आर्थिक स्त्रोत वाढले आहेत.

माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, ज्याने काहीच केले नाही, ते मात्र आजकाल कांगावा पिटत आहेत, ही निवडणूक आपण गनिमी काव्याचा वापर करून जिंकूया.

ज्येष्ठ नेते चंद्रकांत गवळी म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या असमान्य कर्तुत्वाच्या जोरावर कागल शहरात विधायक विकासाचा डोंगर भाग केला आहे.

यावेळी विष्णू कामत, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, रोहित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत नितीन दिंडे यांनी केले. प्रास्ताविक प्रवीण काळबर यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष नवल बोते, अंजुम मुजावर, पद्मजा भालबर आदी उपस्थित होते.