बेलेवाडी काळम्मा: आपला पूर्वीचा गट एकच असून आपली नाळ एकच आहे, असा कांगावा करीत आहेत. परंतु; गेली २५ वर्षे ज्यांनी विश्वासघाताने आमची वाट लावली त्यांची वाट लावल्याशिवाय आता थांबायचं नाही, असा घणाघात माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केला. अशा फसव्या भावनिक कथा सांगत येणाऱ्यांना ठणकावून सांगून परतून लावा, असेही ते म्हणाले.
बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथे २५ कोटी रुपये विकासकामांच्या लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना समरजीत घाटगे यांचे नाव न घेता माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी हा प्रहार केला.
माजी आमदार घाटगे पुढे म्हणाले, ‘मंत्री हसन मुश्रीफ सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून गेली ३०-३५ वर्षे काम करीत आहेत. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करणे ही काळाची गरज आहे. गेली २५ वर्ष आपण त्यांच्याशी संघर्ष केला. मात्र; आपण वैयक्तिक पातळीवर त्यांच्या खाजगी आयुष्यात कधीही डोकावलो नाही. त्यांनीही कधीच आमच्यावर वैयक्तिक पातळीवर येऊन निंदानादस्ती केली नाही. जेव्हा गरज होती, त्यावेळी त्यांनी पाठच्या भावापेक्षाही अधिक सहकार्य केले. म्हणूनच या निवडणुकीत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.
प्रमुख पाहुणे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या रूपाने चिकोत्रा खोऱ्यात कृषी औद्योगिक क्रांती झाली आहे. कारखाना उभा करताना ग्रामस्थांनी दिलेलं योगदान महत्त्वाचे असल्याने आपण हे गाव विकासासाठी दत्तक घेऊ, अशी घोषणा केली होती. आज या गावातील सर्व कामे पूर्णत्वाकडे गेली असून आपण शब्द पाळला असल्याचेही, मुश्रीफ म्हणाले.
यावेळी भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, माजी सरपंच ज्ञानदेव पाटील, शशिकांत खोत, अंकुश पाटील, सूर्याजी घोरपडे, सुभाष गडकरी, उपसरपंच बाळासो सुतार, ग्रामसेवक आर. पी. सातवेकर, सागर पाटील, शशिकांत देसाई, विनोद मुदाळकर, पुंडलिक पाटील, तानाजी पाटील, रंगराव पाटील आदी उपस्थित होते.