मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
रतन टाटा ७ ऑक्टोबरला ते नियमित तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एकच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांची टीम सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होती. अखेर बुधवारी रात्री त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. टाटा सन्सने पत्रकाद्वारे रतन टाटा यांच्या निधन झाल्याची माहिती दिली.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. रतन टाटा यांचे वडील जेआरडी टाटा यांनी 1991 मध्ये टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडले आणि त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटा यांना नियुक्त केलं होतं. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जात होते. उदारीकरणाच्या कालखंडानंतर टाटा समूह आज ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्या उंचीवर नेण्यात रतन टाटा यांचे मोठे योगदान होते.
रतन टाटा यांचे शालेय शिक्षण मुंबईतून झाले. यानंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये बीएस केले. रतन टाटा 1961-62 मध्ये टाटा समूहात सामील झाले. यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राममधून व्यवस्थापनाचे शिक्षण घेतले. 1991 मध्ये ते टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. 2012 मध्ये सेवानिवृत्त झाले. भारतात प्रथमच संपूर्णपणे तयार केलेल्या कारचे उत्पादन सुरु करण्याचे श्रेयही त्यांना जाते. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या या पहिल्या कारचे नाव ‘टाटा इंडिका’ होते. जगातील सर्वात स्वस्त कार ‘टाटा नॅनो’ बनवण्याचे श्रेयही त्यांना जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने लँड रोव्हर आणि जग्वार खरेदी करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवून दिली होती.
रतन टाटा यांना 2000 मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोष्ठ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या पुरस्कराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं.
रतन टाटा यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लाटफॉर्मवरुन ट्विट करत शोक व्यक्त केला. मी गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही रतन टाटा यांच्याशी भेटीगाठी व्हायच्या अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला.रतन टाटा हे एक दूरदर्शी उद्योगपती होते. त्यांनी बोर्डरुमच्या पलीकडेही योगदान दिले असून नम्रता, दयाळूपणा आणि समाजाचे भले करण्यासाठी त्यांनी स्वतःला अनेक लोकांशी जोडले होते, अशा शब्दांत मोदींनी श्रद्धांजली वाहिली.