काँग्रेस नेते राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा यशस्वी करूया : सतेज पाटील

 

  1. कोल्हापूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा यशस्वी करूया, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे झालेल्या नियोजन बैठकीवेळी आमदार सतेज पाटील बोलत होते. यावेळी खासदार शाहू महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. 

4 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजता कोल्हापूर विमानतळावर राहुल गांधी यांचे आगमन होणार आहे. यावेळी त्यांच्या रोड शोचे देखील नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कसबा बावडा येथील भगव्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सायंकाळी सहा वाजता राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. मूर्तिकार सतीश घारगे यांनी हा देखणा पुतळा तयार केला असून तो बहुशस्त्राधारी आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान त्यांनी केले. त्याशिवाय, या कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था, पर्यायी मार्ग यासंदर्भात ही त्यांनी बैठकीत सूचना केल्या.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण झाल्यानंतर शहरातील सर्व 81 प्रभागात अतिषबाजी करण्यात येईल. राहुल गांधी यांचे कोल्हापुरातील कार्यक्रम न भूतो न भविष्य अशा प्रकारे भव्य दिव्य अशा प्रकारे यशस्वी करूया असे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

कसबा बावडा येथील, पॅव्हेलियन मैदानावर 5 ऑक्टोंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित महानाट्य होणार आहे. या कार्यक्रमात 2 हजार कलाकार सहभागी असतील. 1 हजार कलाकार शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत. या कार्यक्रमाला देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही आमदार सतेज पाटील यांनी केले. याशिवाय, कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात राहुल गांधी यांच्या दौऱ्याचे डिजिटल फलक लावावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या.

खासदार शाहू महाराज यांनी, राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे, कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. राहुल गांधी यांचा हा दौरा सर्वांनी मिळून यशस्वी करूया, असे आवाहन केले. देशभरातील परिस्थिती पाहता, काँग्रेसचे विचार देशाला गरजेचे आहेत. हे विचार पुढे घेउन जाऊया. लोकसभा निवडणुकीवेळी सर्वांनी माझ्यासाठी कष्ट घेतले. काँग्रेसची हीच ताकत कायम ठेवूया. असे आवाहनही खासदार शाहू महाराज यांनी केले

या बैठकीला, आमदार जयश्री जाधव, आमदार राजुबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहूल पाटील, चंदगडचे काँग्रेस नेते गोपाळराव पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, शशांक बावचकर, विनायक उर्फ अप्पी पाटील, सरलाताई पाटील, सुलोचना नायकवडे, गोकुळचे संचालक चेतन नरके, कर्णसिंह गायकवाड, तौफीक मुलाणी, शशिकांत पाटील-चुयेकर, बयाजी शेळके, भारती पोवार यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, माजी नगरसेवक विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.