मुंबई : विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी दि. १ ऑक्टोबरपासून घेतल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली असून हे नेते आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेऊन आपला अहवाल देणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून काँग्रेस पक्षाकडे एकूण १६८८ इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार व प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पुणे शहर व पुणे ग्रामीण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्याकडे नागपूर शहर व ग्रामीण, खा. चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे ठाणे जिल्हा, खा. प्रणिती शिंदे यांच्याकडे सांगली व सातारा जिल्हा, मुजफ्फर हुसेन यांच्याकडे अहमदनगर आ. कुणाल पाटील यांच्याकडे नाशिक, माजी मंत्री विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्याकडे मुंबई शहर, अमित देशमुख यांच्याकडे सोलापूर व कोल्हापूर, डॉ. नितीन राऊत यांच्याकडे वर्धा व यवतमाळ, यशोमती ठाकूर यांच्याकडे परभणी व हिंगोली, डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे नांदेड, प्रा. वसंत पुरके यांच्याकडे अकोला, खा. नामदेव किरसान यांच्याकडे वाशीम, खा. डॉ. कल्याण काळे यांच्याकडे लातूर व बीड, खा. डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडे जालना, आ. संग्राम थोपटे यांच्याकडे मुंबई उपनगर, डॉ. वजाहत मिर्झा यांच्याकडे संभाजीनगर, एम.एम. शेख यांच्याकडे धाराशिव, हुसेन दलवाई यांच्याकडे पालघर, शिवाजीराव मोघे यांच्याकडे धुळे व नंदुरबार, सुरेश शेट्टी यांच्याकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड, आ. अभिजीत वंजारी चंद्रपूर व गडचिरोली, सतीश चतुर्वेदी भंडारा व गोंदिया, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांच्याकडे बुलढाणा व अमरावती, ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हे नेते दिनांक १ ते ८ ॲाक्टोबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यात जाऊन इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील व १० ॲाक्टोबर पर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करतील, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.