जागतिक स्केट स्पर्धेत भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने पटकावले कांस्यपदक

दिल्ली: इटली येथे पार पडलेल्या जागतिक स्केट स्पर्धा 2024 मध्ये भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने ऐतिहासिक पदक जिंकले. श्रुतीला सरोदे हिच्या नेतृत्वाखाली कांस्यपदकाच्या चुरशीच्या लढतीत भारतीय महिला संघाने चीनवर विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच पदक ठरले.कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने 127 – 39 अशी बाजी मारली.

महिला संघाला कांस्यपदक जिंकता आले असले तरी, पुरुष संघाला चीनकडून पदकाच्या लढतीत 75 – 119 असा पराभव पत्करावा लागला. अमेरिकेने पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकले. वर्ल्ड स्केट गेम्स ही एक आंतरराष्ट्रीय द्विवार्षिक स्पर्धा आहे. ज्यामध्ये जागतिक स्केट इंटरनॅशनल फेडरेशन द्वारे नियमन केलेल्या सर्व जागतिक रोलर स्पोर्ट्सचा समावेश आहे.