मुंबई: बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्याची बातमी येत आहे. शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वतःवर आणि पोलिसांवर गोळीबार केला व पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांवर देखील गोळीबार केल्याची माहिती आहे. तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली आहे. कळवा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे.
अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला. त्याने तीन राऊंड फायर केलं. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याने पोलिसांच्या पायांवर गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला.
पोलिसांची बंदूक हिसकावून घेत त्याने पोलिसांवर गोळी झाडली. या घटनेत आरोपी अक्षय शिंदेचा मुत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून अजून या बाबतीत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आरोपीने शाळेतील अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता.
दरम्यान, अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अक्षयने स्वत:वर गोळी झाडली की आणखी काही दुसरं आहे. त्याला कोणी गोळी घातली की आणखी काही आहे? याची सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.