जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे दोन सख्ख्या पोलीस भावांवर कारवाई : पोलीस सेवेतून केले मुक्त

कोल्हापूर : जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे दोन सख्ख्या भावांना पोलीस सेवेतून मुक्त करण्यात आलं. पोलीस उपनिरीक्षक महेश रमेश शिंदे आणि पोलीस नाईक विष्णू रमेश शिंदे अशी त्या भावांची नावे आहेत. याचा आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी काढला.

 

 

मिळालेली माहिती अशी की, उपनिरीक्षक महेश शिंदे हे सप्टेंबर 1991 ला तर विष्णु शिंदे हे ऑगस्ट 2004 ला भटक्या जमाती ‘ब’ वर्गातून भरती झाले होते. भरतीवेळी त्यांनी जात प्रमाणपत्र सादर केलं होतं . त्यातून त्यांना आरक्षणातून नोकरी मिळाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने पोलीस सेवेतील सर्वांची जात पडताळणी करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर वारंवार माहिती देऊन सुद्धा या दोघांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलं नव्हतं. दरम्यान पोलीस अधीक्षकाकडून दोघांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत विभागीय चौकशी नेमली. कोल्हापूर आणि गडहिंग्लज येथील अप्पर पोलीस अधिक्षकांनी याची चौकशी पूर्ण केली. त्यांनी दिलेल्या अहवाला नंतर त्या दोघांना सेवेतून मुक्त केलं. त्यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती अधिक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.