मुंबई प्रतिनिधी : मराठा ठोक मोर्चातर्फे आज मुंबईत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एकूणच मराठा आरक्षणाचा प्रश्न किचकट होत असताना तिकडे धाराशिवमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये आरक्षणावर चर्चा झाली.
दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आता ओबीसींची बाजू उचलून धरली असून मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्र सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता विरोधक आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात शाब्दिक युद्ध रंगण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगतिले जाते.
तसेच आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी आणि शिवसेनाआमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पार पडणार होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाने वेळ वाढवून मागितल्यामुळे ही सुनावणी आता तीन आठवड्यानंतर होणार आहे. या सर्व घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे.