सुषमा अंधारे यांचे पोर्शे कार अपघातावरुन सरकारवर टीकास्त्र

डॉ. अजय तावरे हे फक्त रक्ताचे नमुने बदलणे, यापुरते मर्यादित नाहीत. गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं, मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं?, हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं, असा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांनी पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातावरुन सरकारवर टीकास्त्र साधले आहे. 

सुषमा अंधारे यांनी आज आमदार सुनील टिंगरे यांचेही नाव घेतले. ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये अनेक ग्लॅमरस नेम-फेम असणारे आणि बडे प्रस्थ दाखल झाले. हे बडे प्रस्थ मध्यरात्री पोलीस स्थानकात का दाखल झाले होते?, जर खरंच सुनील टिंगरेंनी अजय तावरेंची शिफारस केली होती. मग टिंगरेंनी त्यातून वॉकआऊट करण्याचा प्रयत्न का केला? टिंगरेंनी होय, मी शिफारस केली होती, असं ठामपणे का सांगितले नाही?, शिफारस पत्र व्हायरल झाल्यानंतर त्यावर खुलासा करण्याची वेळ टिंगरेंवर का आली?, असे अनेक सवाल सुषमा अंधारे यांनी यावेळी उपस्थित केले.

4 जूनला निकाल आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा म्हणून पोर्शे कार प्रकरण आणि आरोग्य खात्यातला सावळा गोंधळ या संबंधीचे काही धक्कादायक खुलासे निकालानंतर करेन. पण तोवर डॉ. अजय तावरेच्या जीविताच्या सुरक्षिततेची काळजी वाटते, असे सुषामा अंधारे म्हणाल्या.

अजय तावरेंसाठी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून 2023 मध्ये शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी, असे पत्र सुनील टिंगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले होते.

बड्या बापाच्या लेकाला वाचवण्यासाठी पोलिसांपासून ते शासकीय रुग्णालयातील प्रशासकीय यंत्रणाही कामाला लागल्याचं आता पोलिस  तपासातून समोर आले आहे. मात्र, पोलिसांवर दबाव टाकून राजकीय नेतेमंडळीही याप्रकरणात हस्तक्षेप करत होते. त्यातच, अपघाताच्या दिवशी वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यामुळे, राजकीय दबाव आणि पैशांच्या जोरावर अग्रवाल पिता-पुत्रांकडून कायद्याची ऐशीतैशी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, माध्यम व समाज माध्यमांच्या दबावानंतर आता पोलीस तपास वेगाने सुरू आहे.

🤙 9921334545