महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून, आता सर्वांच्या नजरा 4 जूनकडे लागल्या आहेत. कारण 4 जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याचबरोबर निकालानंतर पुढे काय हे ठरवण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीतील पक्ष आपआपल्या महत्त्वाच्या नेत्यांबरोबर बैठकांवर बैठका घेत आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीत गेल्या दोन वर्षांमध्ये मोठा बदल झाला आहे. या काळात पहिल्यांदा शिवसेना फुटली. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देत उद्धव ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला. या निवडणुकीत महायुती जास्त जागा जिंकत वर्चस्व गाजवणार की पक्ष फुटूनही शरद पवार आणि उद्धव ठाकरे जास्त जागा जिंकत भरारी घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तीन पक्षांची आघाडी असूनही भाजपने यावेळी जवळपास 35 जागा लढवण्याची तयारी केली होती. त्यासाठी ते आग्रही होते. परंतू, यावेळी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी बरोबर असल्याने त्यांना 28 जागा मिळाल्या.
गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र भाजपची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत. त्यामुळे जर भाजपने जास्त जागा जिंकल्या तर फडणवीसांचे राजकीय वजन आणखी वाढणार आहे. पण, एकनाथ शिंदे-अजित पवार यांना बोरबर घेतल्याने भाजपला फटका बसल्यास फडणवीसांचे पक्षांतर्गत विरोध सक्रिय होतील. त्यामुळे फडणवीसांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीसह पवार कुटुंबामध्येही फुट पडली.
यावेळी शरद पवार यांच्या जवळचे असलेले अनेक नेते त्यांना सोडून गेले. अशा परिस्थितीतही शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत जोरदार टक्कर दिली. त्यामुळे या निवडणुकीत जर शरद पवार यांची जादू चालली तर अजित पवारांच्याबरोबर गेलेले अनेक आमदार आणि नेते पुन्हा शरद पवारांकडे येण्याची शक्यता आहे. कारण या निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष 10 जांगांवर तर अजित पवार यांचा पक्ष अवघ्या 4 जागांवर निवडणूक लढवत आहे.
शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जवळपास सर्वच आमदार, खासदार आणि नेते गेले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हाताच्या बोटावर मोजण्याईतके लोक राहिले. मात्र, या परिस्थितीतही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत तब्बल 21 जागा मिळवत त्यांनी आपली झलक दाखवली.