अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळेही अजित पवार चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांत प्रचारादरम्यान, काही उमेदवारांना थेट धमक्या दिल्याने ते टीकेचे धनी बनले होते. मात्र, गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार निवडणूक प्रचारातही सहभागी नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीतील महायुतीच्या सभेला ते उपस्थित न राहिल्यानं त्यांच्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक अर्ज भरला तेव्हाही अजित पवार गैरहजर होते. यावेळी, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल वाराणसीत पोहोचले होते. त्यामुळे, अजित पवार नेमकं कुठं गायब झाले आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर, अजित पवारांची तब्बेत बरी नसल्यानं गैरहजर राहिल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात येत आहे. मात्र, अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
तसं पाहिलं तर अचानक गायब होणं अजित पवारांसाठी नवीन नाही, अजित दादा जेव्हा जेव्हा गायब झाले तेव्हा तेव्हा राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीच्या मुंबईतील सभेत अजितदादा दिसले नाहीत आणि त्यांच्या अदृश्य होण्याच्या चर्चाना पुन्हा एकदा सुरुवात झाली. मात्र, तब्बेत बरी नसल्यानं अजितदादा आराम करत आहेत, त्यामुळेच ते सभेला आले नाहीत. मात्र, शुक्रवारी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेला अजितदादा उपस्थित राहतील असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आलं.
शरद पवारांना जेव्हा अजित पवारांच्या गायब होण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनीही अजित पवारांची तब्ब्येत खरंच बरी नसल्याचं सांगितलं. अजित पवारांच्या या गायब होण्याशी, काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यालाही जोडून पाहिलं जातं आहे. बारामती लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली होती. चंद्रकात पाटील यांनी बारामतीत येऊन शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळेच ते नाराज झाले होते. यावेळी, बारामतीत मतदान कमी होण्याला अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना जबाबदार धरलं होतं.