आयपीएल २०२४ प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना २१ मे रोजी

इंडियन प्रीमियर लीग २०२४ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील साखळी सामने १९ मे रोजी संपणार आहेत. त्यानंतर पुढील आठवड्यात २१ मेपासून प्लेऑफला सुरुवात होणार आहे. दरम्यान, त्यापूर्वी बीसीसीआयने ऑनलाईन तिकीट विक्रीबद्दल मोठी घोषणा केली आहे.

आयपीएल २०२४ प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना २१ मे रोजी, तर एलिमिनेटर २२ मे रोजी होणार आहे. हे दोन्ही सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील. त्यानंतर २४ मे रोजी दुसरा क्वालिफायर, तर २६ मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना चेन्नईला होणार आहे.

दरम्यान, १४ मे रोजी संध्याकाळी प्लेऑफमधील दोन्ही क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्याची तिकीटे ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. मात्र १४ मे रोजी तिकीटे केवळ रुपे कार्ड धारकांसाठीच उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर १५ मे पासून सर्वांसाठी ही तिकीटे उपलब्ध होतील.

तसेच २० मे रोजी रुपे कार्ड वापरकर्त्यांसाठी अंतिम सामन्याची तिकीटे ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध होतील, तर २१ मेपासून सर्वांसाठी अंतिम सामन्याची तिकिट ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध होतील. ही सर्व तिकीटे दिलेल्या तारखेपासून संध्याकाळी ६ वाजल्यानंतर उपलब्ध असतील.

क्रिकेट चाहते सामन्यांची तिकिटे अधिकृत आयपीएल वेबसाईट, पेटीएम ऍप, पेटीएम इनसायडर ऍप आणि इनसायडर.इन यावर उपलब्ध असतील.बीसीसीआयने अशीही माहिती दिली की प्लेऑफच्या सामन्यांसाठी अधिकृत तिकीट एजन्सी म्हणून पेटीएमची नियुक्ती करण्यात आली आहे.