गारगोटी( प्रतिनिधी ) : राधानगरी तालुक्यातील डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या पिंपळवाडी गावास महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत राज्यातील पहिलीच 100% शासकीय अनुदानीत उपसा सिंचन योजनेस 2 कोटी 65 लाख रुपये निधी मंजूर केलेबद्दल पिंपळवाडी ग्रामस्थांनी आमदार प्रकाश आबिटकर यांचा गारगोटी येथे सत्कार करत आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, राधानगरी तालुक्यातील डोंगर माथ्यावरील पिंपळवाडी हे कोरडवाहू गाव असून पावळाळी भात, नाचणी व इतर भाजीपाल सोडून कोणतेच पिक घेता येत नाही. याठिकाणी असणाऱ्या साठवण तलावामधून पाणी उपसा करून सिंचन योजना प्रस्तावित करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचेकडे मतदार संघातील सिंचन प्रकल्पांना निधी देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये 530 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना तत्वत: मान्यता देण्यात आली होती. यामध्ये पिंपळवाडी गावचा देखील समावेश होता.
याकरीता जलसंधारण विभागामार्फत सर्वेक्षण करून त्याचा DPR बनवून महामंडळामार्फत शासनाकडे पाठविला होता. त्यास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचेकडे केलेल्या वेळोवेळी पाठपुराव्यामुळे 2 कोटी 65 लाख रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. सदरची योजना पुर्ण झालेनंतर 300 ते 350 एकर हून अधिक क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पिंपळवाडी गाव सुजलाम-सुफलाम होण्यास मदत होणार आहे. यासारख्या योजना मतदार संघातील डोंगर माथ्यावरील क्षेत्र ओलिताखाली आणण्यास प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राहूरी कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले, अशोकराव फराकटे, राजू वाडेकर, सरपंच महादेव जाधव, उपसरपंच सागर जाधव, सुभाष जाधव, सर्जेराव जाधव, भाऊराव जाधव, तुकाराम जाधव, साताप्पा जाधव, ज्ञानदेव जाधव, सोपान जाधव, अमित पोपले, युवराज जाधव, सुषमा जाधव, भारती जाधव, शोभा जाधव, माया जाधव, मिना पाटील, सविता डोंगळे यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.