थेट पाईपलाईनला वारंवार गळती ; लाखो लिटर पाणी वाया ..

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जात आहे परंतु या पाईपलाईनला वारंवार गळती लागत असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यंदा पाऊस कमी असल्याने मुळातच धरणात पाणी कमी आहे.अशात थेट पाईपलाईनचे लिकेज आणि धरणातून लागलेली गळती यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. दरम्यान यंदा शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन करावे लागणार आहे. यामध्ये प्रशासन काय उपाययोजना करणार हे महत्वाचे ठरणार आहे.

काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरासाठी थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, पाईपलाईनमधून किती पुरवठा होणार आणि भोगावती नदीतून किती सोडण्यात येणार याबाबत कसलेही नियोजन नसल्याने पाणी किती आणि कसे वापरले जाणार याबाबत संभ्रम आहे. पाईपलाईनची गळती आणि पूर्ण क्षमतेने होणारा प्रवाह यासाठी पुढील दोन वर्षांत शेतीसाठी आणि नागरिकांनाही पाणी जपून वापरावे लागणार आहे. अशातच काळम्मावाडी धरणाची गळती रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना हेही महत्त्वाचे कारण ठरणार आहे.

काळम्मावाडी घरण उभारणीपासूनच गळतीचा प्रश्न कायम राहिला आहे. धरणाच्या मुख्य भिंतीतून होणारी गळतीसाठी कोट्यावधींचा निधी दिला परंतु अद्याप कसलेच काम सुरू नसल्याने ही गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला यश आले नाही. गतवर्षीपासून पाणी साठा कमी करून धरणाच्या मुख्य भिंतीला आतून ग्राउंटिंग करण्यासाठी युद्धपातळीवर नियोजन केले जात आहे.

यासाठी गेल्या वर्षी राज्य शासनाकडून ८० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. गळती काढण्यासाठी यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरायचे की नाही, संभ्रम कायम होता. मात्र, पुढील वर्षी धरणात साठा कमी ठेवूनच धरणाच्या मुख्य भिंतीच्या जॅकेटिंगचे काम करावे लागणार आहे.

हे सर्व सुरू असताना धरणातून थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. पाईपलाईनला ठिकठिकाणी होणारी गळती आणि पूर्ण दाबाने पाणी देण्यासाठी सुरू असलेली तयारी पाहता पाईपलाईनमधून किती पाणी आणि बोगद्यातून भोगावती नदीपात्रात किती पाणी सोडले जाते याचा अद्याप अंदाज नाही.

परिणामी यंदा आतापासूनच नदीमध्ये पाणी कमी-अधिक प्रमाणात आणि पात्र कोरडे पडण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. असे असले तरी राधानगरी आणि काळम्मावाडी धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. यामुळे पाणीटंचाई होणार नाही हे जरी निश्चित असले तरी भविष्यातील पाण्याचे नियोजन पाहता शेतीसाठी काटकसरीने पाणी वापरावे लागेल.

काळम्मावाडी व राधानगरी धरणांमध्ये पुरेल एवढा पाणीसाठा आहे. पुढील वर्षी धरण गळती रोखण्यासाठी पाणीसाठा कमी ठेवावा लागेल. यासाठी नियोजन सुरू आहे. शेतीसाठी जबाबदारीने पाणी वापरणे योग्य ठरेल. प्रवीण पारकर, उपअभियंता,