नवी दिल्ली : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाचा होणार आहे. या दिवशी देशभरात सुट्टी द्यावी अशी मागणी केली जात होती. अखेरीस केंद्र सरकारने 22 जानेवारीच्या दिवशी अर्धी सुट्टी जाहीर केली आहे.त्यामुळे अर्धा दिवस शासकीय कार्यालय सुरू राहणार आहे.
केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रामध्ये सुट्टीचा उल्लेख केला आहे. संपूर्ण देश राममय झालाय. याच धर्तीवर 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
या पवित्र सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या कार्यालयांना अर्ध्या दिवसाची म्हणजे दुपारी 2. 30 पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व रामभक्तांना प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम याची देही याची डोळा पाहता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. याबद्दल महाराष्ट्र भाजपकडून ट्वीट करण्यात आलं आहे.
मूर्तीही पोहोचली मंदिरात
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी रामललाच्या अभिषेकाचा विधी सुरू झाला आहे. बुधवारी सकाळी दहा किलो वजनाची रामललाची मूर्ती मंदिराच्या आवारातून बाहेर काढण्यात आली. नगर दौऱ्याची परंपरा आहे. मूळ मूर्तीचे वजन खूप जास्त असल्याने ही प्रतिकृती मंदिर परिसरात फेरफटका मारण्यासाठी नेण्यात आली. यानंतर सायंकाळी उशिरा रामललाची खरी मूर्तीही मंदिरात पोहोचली. कडेकोट बंदोबस्तात ट्रकमधून मूर्ती मंदिरात आणण्यात आली.
यावेळी चंपत राय देखील उपस्थित होते. ही मूर्ती काही वेळात मंदिरात पोहोचेल. त्यानंतर गुरुवारी गर्भगृहात त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सध्या मूर्तीच्या चेहऱ्याभोवती कापड गुंडाळण्यात आले आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी या कापडाचे उद्घटन करतील.