प्रयाग चिखली : करवीर तालुक्यातील सोनतळी परिसरात घरपोडीचे सत्र कायम चालू असून बुधवारी मध्यरात्री चोरट्यानी सोनतळी येथील कुलूप बंद असलेली आठ घरे फोडली दरम्यान सौरभ कांबळे यांच्या घरातील फोटोग्राफीचा कॅमेरा व मोबाईल संच असा पाऊन लाखाचा ऐवज लंपास केला.
करवीर पोलिसांचे पेट्रोलिंग ,स्थानिक ग्रामस्थांचे गस्त असून देखील चोरट्यांचे धाडस वाढत असून देखील दीड महिन्यापासून सुरू झालेले घरपोडीचे सत्र कायम चालू असल्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.
गेल्या महिन्याभरात सोनतळी येथील वीस घरे चोरट्यानी फोडली आहेत तर शनिवारी वडणगे येथील तीन घरे चोरट्यांनी फोडली. बुधवारी पुन्हा एकदा सोनतळी येथील कुलूप बंद घरे चोरट्यांकडून फोडल्यामुळे परिसरात चोरट्यांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून करवीर पोलिसांनी तपासाबाबत कंबर कसली असून पेट्रोलिंग ही सुरू केले आहे. दरम्यान नागरिकांनी एक आठवडाभर रात्रीच्या काळात गस्त देखील घातले. त्यामुळे चोरांनी पळ काढला असावा असा समज असतानाच बुधवारी मध्यरात्री सोनतळी येथील सौरभ कांबळे नारायण कळके धनराज यादव मोहन सातपुते शैलेश अस्वले राकेश मोरे दीपक पांडुरंग पाटील भगवान खांबे या चिखलीतील पूरग्रस्त ग्रामस्थांची सोनतळी येथील कुलूप बंद घरे चोरट्याने फोडली.
सुदैवाने फोडलेल्या घरांमध्ये मोठा ऐवज चोरट्यांना मिळाला नाही. सहदेव मोरे यांच्या घरी भाड्याने राहत असलेले सौरभ कांबळे यांचा फोटो कॅमेरा व मोबाईल असा पाऊण लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
दरम्यान करवीर चे पोलीस निरीक्षक निरीक्षक अरविंद काळे यांनी चोरट्याने फोडलेल्या घरांची पाहणी करून पंचनामाचे आदेश दिले.
आतापर्यंत झालेल्या सर्वच घरफोडीच्या घटनेमध्ये साम्य असून सर्वच घरे ही कुलूप बंद असल्याचे पाहून घरफोडी करण्यात आलेली आहे. दोन आठवडे पुरी झालेल्या चोरीच्या घटनेच्या वेळी
सोनतळी येथील एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे दिसून येतात मात्र त्यांनी मास्क व हातमोजे घातल्यामुळे चोरांची ओळख पटत नाही शिवाय सुरुवातीच्या दोन चोरीच्या घटनेवर श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते तसेच हाताचे ठसे घेण्यात आले होते मात्र चोरांचा तपास लागलेला नाही.
बुधवारच्या घटनेमुळे चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले असून नागरिकांनी सतर्क राहणे व पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे
गेले दीड महिन्यापासून सोनतळी परिसरात सुमारे वीस घरे फोडली आहेत. पोलीस व ग्रामस्थ ग्रस्त घालत आहेत. पोलिसांनी सूचना करून देखील ग्रामपंचायत प्रशासनाने अद्याप एखादा सीसीटीव्ही कॅमेरा देखील बसवलेला नाही. ग्रामस्थांची सुरक्षा धोक्यात आली असून कोणतीही मोठी घटना घडण्या अगोदर ग्रामपंचायतीने हे प्रकरण गांभीर्याने हाताळावे अशी अपेक्षा लोकांच्या मधून व्यक्त होत आहे