गारगोटी येथे भुमिअभिलेख कार्यालय बांधकामासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी( प्रतिनिधी ) : भुदरगड तालुक्याचा महसुली अभिलेखाचा लेखा–जोखा ठेवणारे उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, भुदरगड या कार्यालयाचे काम हे भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहे. सदरची जागा अपुरी असल्यामुळे या कार्यालयात अभिलेख ठेवण्याकरिता देखील जागा अपुरी पडत आहे.

यामुळे येथे कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी व येणाऱ्या नागरीकांची गैरसोय होत असल्यामुळे सदर कार्यालया करीता सुसज्ज व स्व:मालकीची इमारत बांधणे गरजेचे होते. याकरीता करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश आले असून सदर कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 15 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, भुदरगड तालुक्यातील महसुली अभिलेखाचे कामकाज गेली अनेक वर्षापासून भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू होते. अद्ययावत इमारती नसल्याने महसूल अभिलेखाचा कारभार कसाबसा सुरू होता. सदरची इमारत ही लहान असल्यामुळे अधिकारी व नागरीकांची गैरसोय होत होती. यामुळे सदर ठिकाणी नवीन व सुसज्ज इमारत बांधणे गरजेचे होते.

यासाठी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून भूमिअभिलेख कार्यालयाच्या उभारणीसाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याकामास हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 15 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरच याकामाची सुरवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकार्य लाभले असून त्याबद्दल त्यांचे अभार मानले आहे.