मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे. याप्रकरणी आजपासून जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे.तर दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळण्यास विरोध केला जात आहे. या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विनायक राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रातील सध्याचा ज्वलंत विषय म्हणजे मराठा आरक्षण आहे. त्याचपाठोपाठ धनगर आरक्षणाचाही तेवढाच गंभीर प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे यासंदर्भात १८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही आमदार आणि खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत.”
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत देखील विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. “महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. मागच्या निवडणुकीत ज्या पक्षाने जागा जिंकल्या आहेत त्या जागा त्याच पक्षाला देण्यात येणार आहेत. काही अपवादात्मक परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकीत ज्या पक्षाच्या उमेदवारात निवडून येण्याची क्षमता असेल, त्याला उमेदवारी दिली जाऊ शकते. शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत समोपचाराने जागा बदलण्याबाबत चर्चा झाली असून अपक्षांनाही जागा देण्यात येणार आहेत,” असे विनायक राऊत म्हणाले.
डिसेंबरमध्ये राजकारणात मोठा स्फोट होणार
“एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट केवळ आणि केवळ ईडीच्या दबावापोटी सत्तेत सामील झाले आहेत. भाजपला सत्तेची हाव असते त्यामुळे दोघांवर दाबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. यावरून डिसेंबरमध्ये राजकारणात मोठा स्फोट घडून येईल, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं आहे. अजित पवार यांना ठाकरेंनी फ्री हॅन्ड दिला होता. आता त्यांची गळचेपी होत असल्यामुळे ते दिल्लीत जातात,” अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी अमित शहा आणि अजित पवार यांच्या भेटीवरून केली.