जयसिंगपूर ( प्रतिनिधी ): आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी सलगी असून राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रूपये दिल्यास मी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ठिय्या आंदोलन स्थळी घेतली.
निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मी चळवळीच्या माध्यमातून राजकारण करत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला. या आरोपाला उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले कि दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना शेतकरी चळवळीवर गरळ ओकण्याचे व शेतक-यांच्या मनामध्ये भिती निर्माण करण्याचे काम आमदार आवाडे करत आहेत.
जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे हे मी नाकारणार नाही मात्र आमदार आवाडे भिती दाखवितात अशी परिस्थिती नसून जिल्हयातील धरणामध्ये गेल्या वर्षी असणारा पाणीसाठा व आजच्या दिवशी यावर्षी असणारा पाणीसाठा याची परिस्थतीत पाहिल्यास जर व्यवस्थित व काटकसरीने पाणी सोडण्याचे नियोजन केल्यास मे अखेर पर्यंत पाणी पुरवठा होवू शकतो. मात्र राज्यकर्त्यांनी सरकारमध्ये असलेला आपला अधिकार वापरून शेतक-यांचा काटा काढायचा या सुडापोटी धरणामध्ये पाणीसाठा असतानाही धरणातून पाणी न सोडणे व कृषी पंपाची विद्युत पुरवठा खंडीत करणे यासारखे प्रकार करू लागले आहेत. यामुळे मी ऊस परिषदेमध्येच शेतक-यांना सांगितले आहे की ज्वारी व गव्हाचे दर वाढू लागल्याने शेतक-यांनी ऊसाचे क्षेत्र कमी करून गहू व ज्वारीचे पिक करावे.
आमदार प्रकाश आवाडे यांनी पाठिंबा दिलेल्या केंद्र व राज्य सरकारने खताचे दर भरमसाठ वाढविले आहेत यामुळे शेतक-यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मी चळवळीसाठी जगणारा व राजकारण करणारा माणूस आहे. मला राज्यातील शेतकरी सुखी झालेले पहायच आहे.
तुमचं मात्र तसं नसून तुमची दुकानदारी चालविण्यासाठी तुम्ही राजकारण करता यामुळे जर राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना गतवर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रूपये दुसरा हप्ता व चालूवर्षी गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रूपये दिल्यास मी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविणार नसून तुम्ही अथवा तुमच्या मुलाला खुशाल लोकसभेसाठी ऊभे करा याला माझा पाठिंबा असल्याचे मत व्यक्त केले.