पुणे : शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी पवार कुटुंब एकत्र आले. दिवाळी सणाच्या निमित्तानं स्नेहभोजनासाठी पवार कुटुंब एकत्र आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील हजेरी लावली होती.

दिवाळी पाडव्याला दरवर्षी बारामतीमध्ये गोविंदबाग येथे एकत्र येणे ही पवार कुटुंबीयांची परंपरा आहे पण आज (दि. १०) पुणे येथे शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील बाणेरमधल्या निवासस्थानी सर्वजण एकत्र आले. प्रतापराव पवार यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने त्या बारामतीला येऊ शकणार नाहीत म्हणून आज पुण्यात सर्वांची भेट झाली.
अजित पवारांना गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू झाल्याने ते राजकारणातून थोडे सुट्टीवर गेले होते. राजकीय दौऱ्यावर ही जात नसले तरी अजित पवार हे कुटुंबाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले आहेत. कालही त्यांनी ट्विट करून आजारपणातून रिकव्हर होण्यासाठी डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याचे जाहीर केले होते.