मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. त्या नंतर आज त्यांची रवींद्र चव्हाण यांनी भेट घेतली.
त्यांच्या भेटीनंतर हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. अखेर फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर नीलेश राणे यांनी निवृत्तीचा निर्णय रद्द केला असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांना दिली. कार्यकर्त्यांची कामे होत नसल्यामुळे नीलेश राणे नाराज होते मात्र, आता त्यांची नाराजी दूर करणार असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.
नीलेश राणे यांनी दसऱ्याच्या दिवशी आपल्या निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली होती. या निर्णयाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद उमटले होते. नीलेश राणे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी कणकवली येथे मोठी गर्दी केली होती. मुंबईवरूनही अनेक कार्यकर्ते कणकवलीच्या दिशेने निघाले होते. कुडाळ नगरपंचायतीमधील अभिषेक गावडे व प्राजक्ता शिवलकर या दोन नगरसेवकांनी देखील आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.