हुपरी नगरीची ‘ कमाल ‘ कधी ही केली नाही ‘पाणीपट्टी दरवाढ

हुपरी (प्रतिनिधी) : राज्याच्या अनेक शहरात पाणीपट्टी दर वाढी वरून आंदोलने होतात पण चंदेरी सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरी नगरपालिकेने आता पर्यंत कधीच पाणीपट्टी दर वाढ केलेली नाही. विशेष म्हणजे देखभाल दुरूस्ती वाढ होउनही स्वबळावर काम सुरू आहे.

हुपरी नगरपरिषदेची स्थापना 11 एप्रिल 2017 रोजी झालेली असून स्थापने पासून ग्रामपंचायतकालीन दरांप्रमाणे विशेष पाणीपट्टी दराची आकारणी करुन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हुपरी नगरपरिषदेची स्थापना होऊन 6 वर्षे होऊन गेली आहेत.या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये तसेच नगरपरिषद स्थापने पूर्वी तत्कालीन ग्रामपंचायत कालावधीमध्ये देखील सन 2013-2014 पासून आजअखेर म्हणजेच साधारण 10 वर्षांच्या कालावधीमध्ये वार्षिक विशेष पाणीपट्टी दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करणेत आलेली नाही.तरीही पाणीपुरवठा व्यवस्था अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारे केमिकल्स, वितरण नलिका साहित्य व रिपेअरी, पंपिंग मशिनरी देखभाल दुरुस्ती, वीज देयक, इरिगेशन पाणी उपसा देयक, आस्थापना खर्च, पाणी तपासणी फ़ी इत्यादी या सर्व अत्यावश्यक खर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

यामध्ये जॅकवेल जलशुद्धीकरण केंद्र वार्षिक वीज देयक रु. 1 कोटी 3 लाख, इरिगेशन वार्षिक पाणी उपसा देयक रु.27.26 लक्ष, आस्थापना खर्च रु.49.50 लक्ष, केमिकल खर्च 5.74 लक्ष, पाणी तपासणी फी 0.50 लक्ष, वितरण नलिका साहित्य व रिपेअरी, पंपिंग मशिनरी देखभाल दुरुस्ती साहित्य पुरवठा व इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल कामे अंदाजे रु.10 लक्ष असा जवळपास 2 कोटी रु. खर्च पाणीपुरवठा व्यवस्था चालवण्यात येत आहे. तरीही चालू वार्षिक पाणीपट्टी दराप्रमाणे चालू मागणी केवळ रु.54.88 लक्ष इतकी आहे.
यावरुन पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी होणारा खर्च हा प्रत्यक्ष मिळणा-या पाणीपट्टी उत्पन्नापेक्षा बराच जास्त आहे. यासाठी सुधारित पाणीपुरवठा व्यवस्था करुन मीटरींग द्वारे पाणीपट्टी आकारणी करणेचा प्रस्ताव अमृत-२ अभियान अंतर्गत तयार करणेत आलेला असून हा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे.हा प्रकल्प शासन स्तरावरील सर्व मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे 2 ते 3 वर्षांचा कालावधी लागणार आहे.तरीही सद्यस्थितीमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था चालवण्याचा आर्थिक भार कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच 15 वा वित्त आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणीपुरवठा व्यवस्था स्वबळावर चालवणे आवश्यक आहे. सध्या केलेल्या सुधारित वार्षिक पाणीपट्टी दर वाढीप्रमाणे देखील चालू मागणी केवळ रु.1.02 कोटी इतकी येणार आहे.

सर्व बाबींचा विचार करता नगरपरिषदेचा आर्थिक भार व नुकसान भरुन काढण्यासाठी तसेच पाणीपुरवठा व्यवस्था स्वबळावर चालवण्याच्या अनुषंगाने वार्षिक विशेष पाणीपट्टी दरामध्ये वाढ करणे आवश्यक आहे. हुपरी नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी हुपरी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, पाणीपुरवठा व्यवस्था स्वबळावर चालवण्याच्या अनुषंगाने सुधारित वार्षिक पाणीपट्टी दरवाढीप्रमाणे सर्व नागरिकांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.