कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला शारदीय नवरात्रोत्सवात आज तिरुपती देवस्थानाकडून मानाचा शालू प्रदान करण्यात आला आहे. 1 लाख 6 हजार 575 रुपये किमतीचा लाल रंगाचा हा शालू तिरुपती ट्रस्ट सदस्य मिलिंद नार्वेकर, राजेश कुमार शर्मा यांच्याकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला सुपूर्त करण्यात आला आहे.
दरवर्षी हा शालू वाजत गाजत अंबाबाई मंदिरात येत असतो. मात्र यंदा कोणत्याही वाद्याविना अंबाबाई मंदिरात आणण्यात आला. यावेळी गोविंदा गोविंदा असा जयघोषही करण्यात आला. यावेळी नार्वेकर यांच्यासोबत तिरुपती देवस्थान समितीचे पुजारी सुद्धा उपस्थित होते. यावेळी देवस्थान समितीच्या वतीने हा शालू स्वीकारण्यात आला असून दसऱ्या दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीला हा शालू नेसवण्याची परंपरा आहे.
