कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना चहा द्या, त्यांना ढाब्यावर न्या..अशी बेताल वक्तव्ये केली याला प्रत्युत्तर म्हणून कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा निषेध करण्यात आला.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधात बातम्या न देण्यासाठी पत्रकारांना ढाब्यावर न्या.. असा सल्ला एका बैठकीत कार्यकर्ते व पदाधिका-यांना दिला. बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी तीव्र शब्दांत टीका केली. सुळे म्हणतात भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी.
दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा काेल्हापूर प्रेस क्लबने निषेध नाेंदविला. प्रेस क्लबच्या पदाधिका-यांनी व सदस्यांनी पुढच्या आठवड्यात बावनकुळेंचा कोल्हापूर दौरा आहे. यावेळी त्यांना कोल्हापुरी पायताण देऊन निषेध नोंदवण्यात येईल असे स्पष्ट केले.