कोल्हापूर : निधी कोणी आणला त्याला मंजुरी कोणी दिली आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा कोणी केला, हे कोल्हापूरची सुजाण जनता जाणते त्यामुळे पत्रकबाजी करून शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर विकास निधीचे श्रेय इतरांनी लाटू नये, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लगावला आहे.
रंकाळा तलावास निधी मंजूर केल्याबद्दल आमदार जयश्री जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकास जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री दीपक केसरकर आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत आहे.
कन्व्हेन्शन सेंटर, फुटबॉल अॅकॅडमी, पंचगंगा घाट सुशोभिकरण, रंकाळा तलाव संवर्धन व सुशोभीकरण या नाविन्यपूर्ण प्रकल्पांसह शहरातील रस्त्यांसाठी रु.१०० कोटींचा निधी, गांधी मैदान सुशोभिकरण यासाठी आदींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला आहे. परंतु, निधीसाठी पाठपुरावा करायचा एकाने आणि त्याचे फुकटचे श्रेय घ्यायचे दुसऱ्याने ही नव्याने उठाठेव करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार जयश्री जाधव यांच्याकडून सुरु आहे असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे कि, दिगवंत आमदार चंद्रकांत जाधव याच्याकडे शिवाजी पेठ परिसरात सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी मागणी केली होती. त्याचे उद्घाटनही त्यावेळी पार पडले होते पण चंद्रकांत जाधव यांच्या पश्च्यात त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सद्याच्या आमदार जाधव यांच्याकडे पाठपुरावा केला. पण आजतागायत त्यास एक रुपायाचा निधी दिला गेलेला नाही. आमदार निधीतून सीसीटीव्ही सारखे शहरातील मुलभूत प्रश्न मार्गी लागत नसताना शासनाकडून कोट्यावधी निधीसाठी पाठपुरावा करणे, ही बाब जनतेला न पटणारी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गांधी मैदानास मंजूर निधी बाबत आमदार जाधव यांनी श्रेयवाद करण्याचा असफल प्रयत्न केला.
परंतु, निधीबाबतची सत्यता, राजेश क्षीरसागर यांनी केलेला पाठपुरावा जनतेसमोर मांडण्यात आला आहे. त्याचपद्धतीने रंकाळा तलावास मंजूर झालेला निधीही राजेश क्षीरसागर यांच्यामाध्यमातून शिवसेनेने केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच झाला आहे. त्यामुळे याचे श्रेय लाटण्याचा कोणीही निरर्थक प्रयत्न करू नये. आमदार जाधव या कुणाच्या तरी सांगण्यावरून अशी वक्तव्ये करत असून, आमदार जाधव यांनी वेळीच सावध होवून अशा फसवेगिरी प्रवृत्तीच्या लोकांपासून लांब रहावे, असा सल्ला दिला.
आगामी काळातही शहरातील खंडपीठ, हद्दवाढ, श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण यासह इतर मुलभूत सोयी सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरु असून, श्रेयवादाची भूमिका न ठेवता विकासाच्या भूमिकेतून सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
