
नवी दिल्ली : बहुजन समाज पक्षाच्या(बसप) सर्वेसर्वा मायावती यांना ‘इंडिया’ आघाडीत आणण्याच्या प्रयत्नांना खो मिळाला आहे. मायावतींनी उत्तर प्रदेशात स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली.
काही दिवसांपूर्वी बसपचे खासदार दानिश अली यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पाटणा येथे भेट घेतली होती. मायावतींनी नितीशकुमार यांच्याशी चर्चा केल्याने त्यांना इंडिया आघाडीत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांच्या प्रवेशामुळे विरोधकांच्या आघाडीला बळ मिळेल, असे मानले जात होते. पण मायावतींच्या या भूमिकेने इंडिया आघाडीच्या नेत्यांची पंचाईत झाली आहे. बसपचे लोकसभेत १० खासदार आहेत. उत्तर प्रदेशातील जाटव या अनुसूचित जातीच्या समाजावर बसपचा प्रभाव आहे. आता इंडिया आघाडीतील सप, काँग्रेस व रालोद या घटक पक्षांना उत्तर प्रदेशात भाजपसोबत व बसपचाही सामना करावा लागणार आहे.