कोल्हापूर जिल्ह्यात बोगस कामगार नोंदणी ; कोट्ट्यावधीचा घोटाळा

प्रतिनिधी – दत्तात्रय बोरगे

कोल्हापूर : शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात 52 हजार हून अधिक बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. यामधील 30 हजार हून अधिक कामगार बोगस असल्याची शंका व्यक्त होत आहे.

या कामगारांना देण्यात येणाऱ्या मध्यान भोजन उपक्रमातही मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. तसेच घरकुल, शिक्षण ,आरोग्य आदी योजनेचा लाभ देण्यात येत असून त्यामध्ये बोगस लाभार्थी असल्याचे दिसून येत आहे. कामगार नोंदणी करणाऱ्या एजंटने दुकाने थाटली असून हे एजंट लखपती झाले आहेत .या प्रकाराची सखोल चौकशी करून बोगस अनुदान लाटलेल्या व्यक्तीकडून वसुली करावी अशी मागणी होत आहे . विविध प्रकारचे शासकीय कर, इंडस्ट्रीज कर यामार्फत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कोट्यावधीचा निधी जमा झाला आहे.

निधी पडून असल्याचे लक्षात येताच काही राजकीय व शासकीय अधिकाऱ्याची नजर याकडे गेली. यामधून भ्रष्टाचाऱ्याची मोठी साखळी निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात लूट झाली आहे. या निधीमधून 42 प्रकारच्या योजना राबवल्या जातात. बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पहिली ते पाचवी साठी तीन हजार ,दहावी साठी दहा हजार, पदवी शिक्षणासाठी पन्नास हजार तर देशा बाहेर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन लाख अनुदान दिले जाते.तसेच लग्नासाठी पन्नास हजार तर घरकुल योजनेसाठी 50 टक्के सूट दिली जाते. हे अनुदान लाटण्यासाठी एक टोळी निर्माण झाली आहे. या टोळी मार्फत ज्यांना बांधकामाचा गंध नाही अशा लोकांना बांधकाम कामगार ठरवून त्याची नोंदणी केली जाते. नोंदणी करण्यासाठी एक रुपया फी असताना 25 रुपये पासून शंभर रुपयापर्यंत प्रत्येकी फी घेतली जाते. या साखळीतील एजंट लखपती झाले आहेत.

कामगारांना देण्यात येणाऱ्या मध्यान भोजन योजनेतही मोठा घोटाळा झाला आहे. जिल्ह्यात 20744 कामगारांना सायंकाळी तर 28 हजार 644 कामगारांना मध्यात भोजन देण्यात येते. हे भोजन अतिशय निकृष्ट असल्याने कामगार खातच नाहीत जनावरांना घालण्यात येते. इचलकरंजी व सांगली येथून हे भोजन पाठवले जाते. हा ठेका देण्यासाठी राजकीय बळाचा वापर केला आहे. खरे बांधकाम लाभार्थी मात्र वाऱ्यावरच आहेत. या बोगस कामगार नोंदणीची चौकशी करावी व ढापलेले अनुदान वसूल करावे अशी मागणी होत आहे.

🤙 9921334545