
कोल्हापूर प्रेस क्लब व प्रेस फोटोग्राफर आयोजित अवतीभवती छायाचित्र प्रदर्शनाचा समारोप
कोल्हापूर:: जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब पुरस्कृत व कोल्हापूर प्रेस फोटोग्राफर यांच्या वतीने आयोजित ” अवतीभवती ” छायाचित्र प्रदर्शनाचा शनिवारी समारोप झाला. जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी आज या प्रदर्शनाला आवर्जून भेट देत, कोल्हापूर वृत्तपत्रातील छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचे कौतुक केले.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे दिवंगत छायाचित्रकार शशी उरुणकर दालनात दि.१९ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते व आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाले होते. गेल्या आठ दिवसांत युवराज्ञी संयोगिताराजे,राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर,खासदार धनंजय महाडिक तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनाला भरभरून दाद दिली.तसेच सामाजिक संस्था, संघटना,शालेय विद्यार्थी व अबालवृद्धांनी या प्रदर्शनाला भेट देऊन एक वेगळा अनुभव घेत,अवतीभवती घडलेल्या घटनांचे छायाचित्राच्या माध्यमातून साक्षीदार झाले.
दरम्यान काल निर्धार सभेनिमित्त जिल्हा दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट देत,प्रत्येक छायाचित्र पारखून पाहताना संबंधित छायाचित्रकारांकडुन माहिती घेतली. छायाचित्रकारांचे कौतुक करताना,दरवर्षी अशा प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली. दरम्यान कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी खासदार शरद पवार यांचे स्वागत केले.कोल्हापूर प्रेस क्लब व प्रेस फोटोग्राफर यांच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.बी. डी.चेचर यांनी प्रास्ताविक केले.
संचालक आदित्य वेल्हाळ यांनी आभार मानले.यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड,जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील,शहराध्यक्ष आर.के.पवार यांच्यासह मोहन मेस्त्री,अनिल वेल्हाळ, संजय देसाई, शशिकांत मोरे,पप्पू अत्तार, नसीर अत्तार,राज मकानदार, मिलन मकानदार,अर्जुन टाकळकर,नाज ट्रेनर,दीपक जाधव, पांडुरंग पाटील, वसीम अत्तार, मालोजी केरकर, राहुल गायकवाड, संदीप मोरे, संजय साळवी, विजय टिपुगडे, इम्रान गवंडी आदी प्रेस फोटोग्राफर्स उपस्थित होते.
