गोकुळचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी निषेध आंदोलन

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचे पशु वैद्यकीय अधिकारी अनिरुध्द पाटील यांना, बिद्री कारखान्याच्या संचालक पुत्राकडून बेदम मारहाण झाली. या घटनेचे पडसाद गोकुळ संघाच्या कर्मचाऱ्यांमध्ये उमटले. ताराबाई पार्कातील गोकुळच्या कार्यालयासह, ठिकठिकाणच्या चिलींग सेंटरवर कर्मचारी संघटनेनं आंदोलनं केलीत. वैद्यकीय अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या धीरज पाटीलनं माफी मागितली नाही तर, संघ व्यवस्थापनानं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेनं केली आहे.

आयटकशी संलग्न गोकुळ दूध संघाच्या कर्मचारी संघटनेच्यावतीनं आज सायंकाळी ताराबाई पार्कातील गोकुळच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार निदर्शनं झाली. गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी अनिरुध्द पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ, हे आंदोलन झालं. मारहाण करणाऱ्याचं नाव धीरज पाटील असं आहे. धीरज हा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि बिद्री कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील यांचा मुलगा आहे. डॉ. अनिरुध्द पाटील यांनी सरवडे इथल्या राजेंद्र पाटील यांच्या गोठ्याला भेट दिली होती. त्यावेळी राजेंद्र पाटील आणि डॉ. अनिरुध्द पाटील यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. त्याचा राग मनात धरुन, धीरजने आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन, बिद्री इथल्या चिलिंग सेंटर परिसरातील कर्मचारी निवासात डॉ. पाटील यांना मारहाण केली.

१९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. पत्नी आणि मुलांसमोरच मारहाण झाल्यानं, डॉ. पाटील यांना मानसिक धक्का बसलाय. मारहाणीच्या घटनेची माहिती, त्यांनी संघाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांना दिली. पण अध्यक्षांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळं कर्मचारी संघटनेला आंदोलन करावं लागलं. गोकुळच्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा हल्ला अथवा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा कर्मचारी संघटनेचे सदाशिव निकम यांनी दिला. बाईट – सदाशिव निकम, कर्मचारी संघटनाशासकीय पशुवैद्यकीय सेवा पुरेशी सक्षम नाही. त्यामुळं पशुपालकांना गोकुळवर अवलंबून रहावं लागतं.

संघाला पशुवैद्यकीय अधिकारी मिळवण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. पर जिल्ह्यातील काही डॉक्टर, गोकुळच्या पशुवैद्यकीय सेवेत आहेत. परजिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना अशा पध्दतीनं दमदाटी आणि मारहाण होऊ लागली तर, गोकुळला पशुवैद्यकीय अधिकारी मिळणं कठीण बनेल. त्यामुळं गोकुळ व्यवस्थापनानं सर्वच कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावं आणि मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. आंदोलनात कॉम्रेड रघुनाथ कांबळे, कर्मचारी संघटनेचे व्ही. डी. पाटील, मल्हार पाटील, रघुनाथ गणेशाचार्य, लक्ष्मण पाटील यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.