
चिखली मध्ये अद्याप पूरस्थिती नाही
प्रयाग चिखली वार्ताहर..
कोल्हापूर: पंचगंगेला आलेल्या पुराचे पाणी श्रीक्षेत्र “प्रयाग” येथील दत्त मंदिरा च्या परिसरात पसरले असून पुराच्या पाण्याने दत्त मंदिराला वेडा घातला आहे तर येथील गणेश मंदिरामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

क्षेत्र प्रयाग संगम परिसरात कुंभिकासारी भोगावती तुळशी इत्यादी नदीचे पुराचे पाणी एकवटले असल्याने या ठिकाणी पुराच्या पाण्याचा प्रचंड डोह निर्माण झाला आहे. मात्र प्रयाग चिखली गावामध्ये अद्याप पुराची कोणतीही गंभीर स्थिती निर्माण झाली नसून पुराचे पाणीही अद्याप गावाच्या वेशी बाहेर आहे. सध्या तरी पुराच्या पाण्याचा कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही. दरम्यान संभाव्य पुरस्थिती लक्षात घेऊन चिखली आंबेवाडी गावांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून ग्रामस्थ ही संभाव्य पुरस्थिती ला सामोरे जाण्यासाठी योग्य त्या यंत्रणेसह सज्ज झाले आहेत. सोनतळी येथील पुनर्वसन वसाहतीमध्ये ज्यांनी पर्यायी घरकुले बांधली आहेत त्यांनी पूरस्थितीचा अंदाज घेऊन जनावरांसह पर्यायी घराकडे जाण्याची तयारी केली असल्याचे चित्र दिसून येत आहे दरम्यान आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने चिखली आंबेवाडी गावामध्ये पूरस्थिती मध्ये योग्य ती बचावात्मक यंत्रणा राबवण्याच्या दृष्टीने तरुण कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले असल्याचे सांगून सध्या संभाव्य पूरस्थितीच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी ग्रामस्थांनी व प्रशासनाने घेतली असल्याची माहिती चिखलीचे लोकनियुक्त सरपंच रोहित रघुनाथ पाटील यांनी दिली.
