
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक पदी संतोष सी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कार्यरत असलेले संजयसिंह चव्हाण यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने आज (शुक्रवारी) तब्बल ४१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये संजयसिंह चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडली. जिल्हा परिषदेतील विविध योजना अतिशय प्रभावीपणे राबविल्या त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. गेले चार महिने चव्हाण यांच्या बदलीची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती आज त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. जिल्हा परिषदेमध्ये रिक्त झालेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहसचिव होते.
