
कोल्हापूर : राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली. मुश्रीफ हे शुक्रवारी (७ जुलै २०२३) कोल्हापूरला येत आहेत. दरम्यान कागल येथे त्यांचा नागरी सत्कार आणि जाहीर मेळावा आयोजित केला आहे.
दुपारी 4 वाजता गैबी चौकात हा कार्यक्रम होत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठकीत झाली या बैठकीत कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी या बैठकीत बोलताना केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने म्हणाले, राजकीय जीवनात अनेकदा वेगवेगळे निर्णायक प्रसंग येतात. यावेळी निर्धाराने पुढे जावेच लागते. या माध्यमातून गोरगरीब, दीनदलित, वंचित, उपेक्षित लोकांसाठी अधिक जोमाने कार्यरत राहू. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही सर्वजण ठामपणे उभे आहोत. मिळालेल्या सत्तेचा वापर कशा पद्धतीने करायचा हे येत्या काळात दाखवून देऊ,” गोकुळचे संचालक युवराज पाटील म्हणाले, वाड्या वस्त्यांवर पसरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मंत्री मुश्रीफांच्या पाठीशी राहतील. कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील- कुरुकलीकर यांनी प्रास्ताविक केले. गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी आभार मानले. बैठकीला बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह पाटील, गोकुळचे संचालक युवराज पाटील, कागल तालुका संघाचे चेअरमन जीवन शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोज फराकटे, रंगराव पाटील, शामराव पाटील, जयवंत पाटील-कासारीकर, पंचायत समितीचे माजी सभापती जयदीप पोवार, सूर्याजी घोरपडे, संजय चितारी, इरफान मुजावर, निलेश शिंदे, मयूर आळवेकर उपस्थित होते.
