
मुबंई : खासदार अमोल कोल्हे हे राजभवनामधील शपथविधीसाठी अजित पवारांबरोबर उपस्थित होते. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी ‘मी साहेबांबरोबर आहे,’ असं म्हणत आपण शरद पवारांबरोबर असल्याचं जाहीर केलं आहे. अमोल कोल्हेंनी या बंडखोरीनंतर आपली भूमिका मांडताना थेट राजीनामा देण्याची भाषा केली आहे.

आपण शरद पवारांकडे राजीनामा सादर करणार असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे. राज्यामध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण राजीनामा देणार असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदारांनी जे मतदान केलं ते एका विचारधारेवर विश्वासावर ठेऊन केले असल्याने मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार असून माझा आतला आवाज सांगतोय की मी शरद पवारसाहेबांसोबतच रहावं, अमोल कोल्हेंनी एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. आज अमोल कोल्हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
