छत्रपती शाहू महाराज वसुंधरा ग्रामपंचायत पुरस्कार योजनेचा प्रारंभ

कोल्हापूर : हरित महाराष्ट्र संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आणि त्यातून दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि इतर नैसर्गिक आपत्ती वर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्यातील सध्याचे क्षेत्र २०% वरून ३३ % पर्यंत नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे. सदर अभियान अंतर्गत भूमी, वायू, जल, अग्नी व आकाश या पंचमहाभूते तत्वांशी निगडीत विविध उपक्रम राबवून शाश्वत विकास साध्य करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याचाच भाग म्हणून सदर अभियानात उत्कृष्ठ काम करणा-या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत राजर्षी शाहू छत्रपती महाराज वसुंधरा ग्रामपंचायत पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. सदर पुरस्कार योजनेचा कालावधी दिनांक २६ जून २०२३ ते ६ मे २०२४ पर्यंत असून त्याची सुरुवात आज सोमवार २६ जून २०२३ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी करण्यात आली.वसुंधरा अभियानामध्ये उत्कृष्ठ काम करणा-या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज वसुंधरा ग्रामपंचायत पुरस्कार देण्यात येणार आहे.

सदर पुरस्कार अंतर्गत वृक्ष लागवड, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, अपारंपारिक ऊर्जा वापर , सौर ऊर्जा प्रकल्प , बॉयोगॅस , सौरपंप, रेन वॉटर हार्वेस्टिंग , जल प्रदूषण कमी करणे , पाणथळ जागाचे संवर्धन ,कृषी कचरा व्यवस्थापन , फटाकेबंदी , इलेक्ट्रीक वाहने व चार्जिंग स्टेशन इत्यादी बाबीचे १०० गुणाचे निकष ठेवण्यात आले आहेत. सदर पुरस्कार अंतर्गत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक ७ लाख, व्दितीय क्रमांक ५ लाख, तृतीय क्रमांक ३ लाख व तालुकास्तर पुरस्कार प्रत्येक तालुक्यातून प्रथम क्रमांक साठी २ लाख चे बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे.

सदर अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींनी केलेल्या कामकाजाची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत जिल्हास्तरावरील पुरस्काराची निवड करण्यात येईल व गट विकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती यांचे अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत तालुकास्तरावरील पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे.या अनुषंगाने जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत २६ जून २०२३ पासून राजश्री छत्रपती शाहू महाराज वसुंधरा ग्रामपंचायत अभियानाची सुरुवात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये करण्यात आलेली आहे. वृक्ष लागवड चे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला १००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

त्याचाच भाग म्हणून आज दिनांक २६ जून रोजी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनी १००० वृक्ष लागवड लागवडीचा शुभारंभ कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ग्रामपंचायत वाटर तर्फे वडगाव व ग्रामपंचायत संभापूर तालुका हातकणंगले येथे करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गटविकासअधिकारी डॉ. शबाना मोकाशी, सहायक गट विकास अधिकारी यु. के. महाले, जि.प. चे विस्तार अधिकारी(पंचायत) ए. एस. कटारे, तसेच ग्रामपंचायत वाठार तर्फे वडगाव व संभापूर ग्रामपंचायत चे सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

🤙 8080365706