आषाढी यात्रेत होणार 15 लाख भाविकांची आरोग्य तपासणी

पंढरपूर : यंदा आषाढी यात्रेमध्ये लाखो विठ्ठल भक्तांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प शिंदे फडणवीस सरकारने केला आहे. जवळपास 15 लाख भाविकांची आरोग्य तपासणी या यात्रेत होणार असल्याने ही वारी आरोग्य वारी ठरणार आहे.

एका बाजूला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला भुलवण्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपूर वारी करत असताना, राज्यातील शिंदे सरकारने वारकऱ्यांसाठी यंदाची वारी आरोग्य वारी करण्याचा चंग बांधला आहे. याची संपूर्ण जबाबदारी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांच्यावर सोपवली असून जवळपास 10 हजार तज्ज्ञ डॉक्टर्स आणि वैद्यकीय स्टाफ लाखो वारकऱ्यांच्या सेवेत असतील. पालखी सोहळे पंढरपुरात दाखल झाल्यावर 29 जून आणि 30 जून रोजी दर्शन रांग असणाऱ्या गोपाळपूर पत्रा शेडजवळ दुसरे महाआरोग्य शिबीर सुरु होणार आहे. याचवेळी साडेतीन लाख भाविकांच्या निवासाची व्यवस्था असणारे तिसरे आरोग्य शिबीर सोलापूर रोडवरील 65 एकराजवळ ठेवण्यात आले आहे. पालखी सोहळ्याच्या सोबत आणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या 463 दिंड्यांची तपासणी संपूर्ण मार्गावर झाली असून यातही लाखो वारकऱ्यांची तपासणी राज्याच्या आरोग्य विभागाने केली आहे. संपूर्ण यात्रेत जवळपास 15 ते 16 लाख भाविकांच्या आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी औषध साठे, वैद्यकीय उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

🤙 8080365706