
सरवडे: माझ्या मतदार संघातील राधानगरी तालुक्यातील जयवंत पोवार हे आपल्या कुटुंबियांसह पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असता मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातात जयवंत पोवार यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगा, सासुबाई, म्हेवणे व जिपचालक यांचा जागीच मृत्यु झाला असून 2 मुलींवर कोल्हापूर येथे उपचार सुरू असून अपघातामध्ये मृत्यु झालेल्या नागरीकांना व रेल्वे अपघातामध्ये मयत झालेले वारकरी आनंदा व्हरकट यांना मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत करा अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

निवेदनात म्हणले आहे आहे, माझ्या विधानसभा मतदार संघातील सरवडे गावामध्ये जयवंत पोवार हे वास्तव्यास होते. ते दि.17/05/2023 रोजी सकाळी गावाहून मिरज मार्गे पंढरपूर येथे देव दर्शनासाठी जात होते. मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रॅक्टर आणि चारचाकी गाडीच्या भीषण अपघातामध्ये जयवंत पोवार, त्यांच्या पत्नी स्नेहल पोवार, मुलगा सोहम, सासुबाई कोमल, मेव्हणे लक्ष्मण शिंदे व जिपचालक उमेश शर्मा यांचा मृत्यु झाला. त्यांच्या 2 मुलींवर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. पोवार कुटुंबावर काळाने घाला घालून आई-वडील आणि भाऊ हिरावल्यानंतर त्या मुलींचा आधार हारपला आहे. यामुळे त्यांना संगोपनासाठी आर्थिक मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सरवडे गावातील वारकरी आनंदा विठ्ठल व्हरकट हे पायी दिंडीकरीता गावातील वारकरी बांधवांसोबत निघाले होते. ते गेली अनेक वर्षे गावातून जाणार्याा आषाढी दिंडीत सहभागी होत असायचे. यावर्षी देखील ते दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीत ट्रक चालवण्याची सेवा करीत होते. सोमवारी दि.19/06/2023 रोजी सकाळच्या 6 च्या सुमारास लोणंद येथील रेल्वे रुळ ओलांडताना झालेल्या दुर्घटनेमध्ये त्यांचा जागीच मृत्यु झालेला असून त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. वारीत ट्रक चालकाचे काम वारकर्या,चा अपघातीमृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत असून सरवडे गावावर शोककळा पसरली आहे. यामुळे पाटील व व्हरकट कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून अर्थसहाय्य करावे अशी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.
