
कागल : आक्षेपार्ह स्टेटस लावलेल्या कागल येथील फारूख आलासकर यांचे वडील यासीन मियालाल आलासकर यांचे कागल मुस्लिम जमीयतचे सभासदत्व एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.

येथील मुस्लिम समाजाने बैठक घेऊन हा एकमुखी निर्णय घेतलेला आहे. कागलमधील या तरुणांने आक्षेपार्ह स्टेटस लावल्यानंतर काल कागल ममध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यासंबंधी येथील मुस्लिम समाजाने कागल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी, मुस्लिम समाजाच्या बैठकीत झालेला हा निर्णय नोटीसद्वारे यासीन मियालाल आलासकर यांना कळविला आहे. या नोटिसीमध्ये म्हटले आहे, आपला मुलगा फारुख आलासकर यांच्या मोबाईलवरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कागल शहरात अशांतता निर्माण झाली. आपल्या दोन्हीही मुलांना सक्त ताकीद देऊन असे दुष्कृत्य परत होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही या नोटीसमध्ये दिले आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांच्या अशा चुकीच्या वागण्याने संपूर्ण समाज अडचणीत आला आहे. इतर समाजाशी असलेले सलोख्याचे संबंध बिघडत आहेत, याकडेही लक्ष वेधले आहे.
