
कोल्हापूर : राज्य शासन दिनांक 15 एप्रिल 2023 पासून राज्यातील सर्व जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवत आहे. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 11 जून 2023 रोजी तपोवन मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात येत असून जिल्ह्यातील 75 हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत कार्यक्षमपणे पूर्ण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयातून आलेले जनकल्याण कक्षाचे समन्वयक तथा मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अमित हुक्केरीकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी सतीश जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कामत, रवींद्र माने यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
