

खातेधारकांची मागणी वाढतेय ; कार्ड देण्यास बँक असमर्थ
साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे
साळवण : एकीकडे कॅशलेस अर्थव्यवस्थेचा विचार केला जात असताना, दुसरीकडे मात्र बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साळवण (ता. गगनबावडा) येथे ‘एटीएम’ कार्डचा तुटवडा असल्याची स्थिती बघावयास मिळत आहे.

कार्डसाठी खातेधारकांकडून मागणी वाढत असताना, तसेच वाटप केलेले कार्डची मुदत संपलेली असताना बँक मात्र आपल्या खातेधारकांना कार्ड देण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे बहुतांश बँकेचे कार्डधारक ‘एटीएम’ कार्डच्या प्रतीक्षेत आहेत.ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून व्यवहार वाढले असले तरी डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. नवीन खाते उघडताना खातेदारांकडून हमखास ‘एटीएम’ कार्डची मागणी केली जाते. प्रामुख्याने रूपे कार्ड हे डेबिट असून या कार्डचा वापर एटीम मधून पैसे काडण्यासाठी केला जात आहे.दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्र खातेधारकांना तत्काळ ‘एटीएम’ कार्ड देण्यास असमर्थ ठरत असल्याने, खातेधारक जिल्हा मध्यवर्ती बँकेसह इतर खाजगी बँकांचा विचार करीत आहेत. वास्तविक राष्ट्रीयकृत बँका तत्काळ कार्ड देण्यास तत्परता दाखवत आहेत. तर दुसरीकडे बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साळवण या बँकेची यंत्रणा कमकुवत दिसत असल्याने खातेधारकांना दिलेल्या मुदतीत देखील कार्ड उपलब्ध होत नसल्याचे स्थिती आहे.सध्या पावसाळा तोंडावर आल्याने आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी खातेधारकांना बँकेच्या चालढकल नियोजनामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, ‘एटीएम’ कार्डचा पुरवठा केला जावा, अशी मागणी खातेदारांकडून केली जात आहे.
