कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक व मिरवणूक उत्साहात……

कागल :कागलमध्ये गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, सरसेनापती साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, नगरपालिका मुख्याधिकारी श्रीराम पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. बसस्थानकाजवळच्या अश्वारूढ पुतळा परिसरात प्रमुख मान्यवरांसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी दहा वाजता ऐतिहासिक गैबी चौकातून शहराच्या मुख्य बाजारपेठेतून सवाद्य मिरवणूक निघाली. मिरवणुकीत हातात भगवे ध्वज व भगव्या टोप्या परिधान केल्यामुळे वातावरण भगवामय झाले होते.

गैबी चौकातून निघालेली ही मिरवणूक पुढे पोलीस स्थानक, खर्डेकर चौक, कोल्हापूर वेश कमानीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यापर्यंत आली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय जिजाऊ जय शिवराय,” अशा घोषणांच्या निनादात ही मिरवणूक निघाली.

गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आम्हा बहुजनांची अस्मिता आहे. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्रीपदाच्या काळात शिवराज्याभिषेक दिनाला “शिवस्वराज्य दिन” म्हणून शासन निर्णय घोषित केला. गोकुळ दूध संघाचे संचालक व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, ६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याने रयतेच्या शाश्वत आणि चिरंतन स्वराज्याचे सार्वभौमत्व दुर्ग रायगडाच्या राजसदरेवरून घोषित झाले. म्हणूनच महाराष्ट्रभर ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होत आहे. राज्यभरातील २१ हजार ग्रामपंचायतीसह, ३५१ पंचायत समित्या व ३४ जिल्हा परिषदांवर शिव स्वराज्याची भगवी गुढी मोठ्या डौलाने फडकत आहे.

गोकुळ दूध संघाचे संचालक अमरीशसिंह घाटगे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म, शिवराज्याभिषेक अशा विषयांवर तारीख आणि तिथी यावरून जनतेत संभ्रम निर्माण केला जातो. शिवप्रेमींमध्ये सातत्याने दुफळी निर्माण करण्याचाच हा प्रयत्न आहे.

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे संचालक व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, गोकुळ दूध संघाचे संचालक अमरीशसिंह घाटगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, अजित कांबळे, शामराव पाटील, नगरसेवक प्रविण काळबर, नामदेवराव पाटील- मळगेकर, यशवंतराव गुरव, नवाज मुश्रीफ, अस्लम मुजावर, ईरफान मुजावर, सतीश पोवार,अमित पिष्टे, संजय फराकटे, विवेक लोटे आदी प्रमुखांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

🤙 8080365706