
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारला लकवा मारला होता, अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरपूस भाषेत समाचार घेतला आहे. राज्यात सरकार आहे का? तेव्हा लकवा मारला होता म्हणता. तुमचं सरकार आता स्मशानात पोहोचलं आहे. काहीच हलत नाही. कान, नाक, डोळे सर्व बंद आहे. लकव्याच्या गोष्टी करू नका, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली.

संजय राऊत यांनी नगरच्या नामांतराला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला होता. याच सत्ताधाऱ्यांनी तो पुतळा हटवला होता. त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. म्हणून सरकारला उपरती झाली. अहिल्यादेवींच्या नावाने एखादा जिल्हा ओळखला जाणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो, असं संजय राऊत म्हणाल्या. अहिल्यादेवी होळकर या उत्तम राज्यकर्त्या होत्या. कुशल प्रशासक होत्या, असंही त्यांनी सांगितलं.
