
गारगोटी : शिवकालीन ऐतिहासिक ठेवा असलेल्या भुदरगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे व उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांना केल्या..

राज्य शासनाच्या ब वर्ग किल्ले संवर्धन मध्ये भुदरगड तालुक्यातील भुदरगड व रांगणा हे किल्ले आहेत. परंतु गेले कित्येक वर्षापासून या किल्ल्यांच्या संवर्धन न झाल्यामुळे किल्ल्यावरील जुनी मंदिरे, बुरुज, तटबंदी, विहिरी, तलाव यांच्यासह छुप्या वाटा, गुहा असे अनेक ऐतिहासिक ठेवे नामशेष होत आहेत. यासर्व गोष्टी जतन व संवर्धन करणे हे काळाची गरज असून भुदरगड किल्ला परिसर जतन व संवर्धन करणे व तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भैरवनाथ देवालयाचा जिर्णोद्धार करण्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी, पंचक्रोशीतील सरपंच सदस्य व सर्व मानकरी यांच्या उपस्थितीत किल्ले भुदरगड आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्रामुख्याने भैरवनाथ देवालयाचा जिर्णोद्धार, सभामंडप, गडावरील तळ्यातील गाळ काढणे व तलाव परिसरामध्ये बोटिंग सुविधा उपलब्ध करणे, तळ्याभोवती पथमार्ग तयार करणे, फुलपाखरू उद्यान निर्मिती करणे, वॉच टॉवर उभारणी करणे, गडावरील ओसाड माळावर विविध जातींचे वृक्षारोपण करणे याकरिता तज्ञांची मार्गदर्शन घेणे, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, दर्शन कमान निर्मिती करणे, तसेच पुष्पनगर व मुरूक्टे फाटा येथे प्रवेशदार उभारणी करणे यासर्व बाबींचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला आहे. भैरवनाथ देवालयाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांना व पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्याबाबतची आराखड्यामध्ये समावेश करण्याबाबत चर्चा झाली.
यावेळी उपस्थित मानकरी सरपंच महोदय यांनी विविध सूचना केल्या याबाबत सर्व कामांचे नियोजन व जबाबदाऱ्या निश्चित करत पुढील 15 दिवसांमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी या सर्व प्रस्तावित कामांचा आढावा घ्यावा व या सर्व कामांचे नियोजन करण्यासाठी 10 व्यक्तींची समिती तयार करण्याचे सर्वानुमते ठरले.यावेळी बैठकीस उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अश्विनी अडसूळ, गटविकास अधिकारी शेखर जाधव, पुरातत्व विभागाचे उत्तम कांबळे, उपअभियंता मिरजकर, उपअभियंता धनाजी कुंभार, वनविभागाचे अधिकारी शेवडे, जलसंधारण विभागाचे अविनाश पदमाळे, माजी सभापती बाबा नांदेकर, गोकुळचे माजी संचालक दौलतराव जाधव, माजी सभापती सुनीलराव निंबाळकर, गडबिद्री सरपंच सुरेखा देऊलकर, उपसरपंच राजाराम सुतार, राणेवाडी सरपंच स्वाती राणे, उपसरपंच विजय मोरे, माजी सरपंच बाळासाहेब वरणे, सचिन कांबळे, अविनाश कालेकर, राजू भारमल, संतोष शिंदे, सुनील किरोळकर, योगेश पाटील, सातप्पा कल्याणकर, अभिजीत जाधव, मारुती कांबळे, बाळ घाडगे यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
