
कोल्हापूर: जुळ्या मुलांचे गरोदरपण म्हणजे मोठी जोखीम असते. मुदतपूर्व गर्भपात ही समस्या उद्भवण्याची शक्यता यामध्ये खूप जास्त असते. अशा वेळी एका अर्भकाचा गर्भपात झाला की, गर्भाशयाचे मुख उघडे असल्याने पाठोपाठ दुसऱ्याचाही गर्भपात होतो. दुर्दैवाने या घटनांमध्ये एकही मुल वाचत नाही. या नैसर्गिक घटनेला अपवाद ठरणारे अचंबित करणारी आशादायक घटना कोल्हापूरच्या पत्की हॉस्पिटलमध्ये घडली आहे.

जुळ्यांमधील एका अर्भकाचा पाचव्या महिन्यात गर्भपात झाल्यानंतर गर्भपाताची प्रक्रिया थांबवून गर्भाशयात असलेल्या बाळाला वाचवून त्याची त्यानंतर तब्बल ११५ दिवसांनी यशस्वी प्रसूति करण्यात डॉक्टरांच्या चमूला यश आले आहे. हॉस्पिटलच्या या यशाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या जुळ्यांची जन्म कथा अशी आहे जुळ्यांचे जोखमीचे गरोदरपण, त्यामध्येच सुरू झालेला मधुमेहाचा त्रास अशा अडचणींना सामोरे जाणाऱ्या महिलेला पाचव्या महिन्यातच रक्तस्त्राव होऊन मुदतपूर्व प्रसूति वेदना सुरू झाल्या व काही तासांमध्येच जुळ्यांपैकी पहिल्या अर्भकाचा गर्भपात झाला. मात्र, वैद्यकीय शास्त्रामधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य वापरून पत्की हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या चमूने गर्भपाताची पुढील क्रिया थांबवण्यात यश मिळवले. मातेची अफाट जिद्द व डॉक्टरांच्या कौशल्यांची पराकाष्ठा यामुळे हा गर्भ पुढे तब्बल ११५ दिवस सुखरूप पद्धतीने वाढविला. त्यानंतर त्या महिलेची प्रसूति सिझेरियन पद्धतीने करून एका सुदृढ बालकाचा जन्म झाला. मातृत्व मिळवण्यासाठी असलेली जिद्द आणि अतिजोखमीच्या व गुंतागुंतीच्या सर्व प्रसंगांना यशस्वीरीतीने सामोरे जाणाऱ्या या मातेचा पत्की हॉस्पिटलच्या वतीने आंतरराष्ट्रीय मातृदिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला . या घटनेविषयी हॉस्पिटलचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तर डॉ. सतीश पत्की म्हणाले, ही केस दुर्मीळ तसेच आव्हानात्मक होती. या महिलेस गरोदरपणामधील प्रसूति वेदना या तक्रारीसाठी हॉस्पिटलच्या इमर्जन्सी विभागात दाखल करण्यात आले होते. वेदनांची तीव्रता वाढत गेली व गर्भाशयाचे मुख पूर्णपणे उघडल्यामुळे जुळ्यांपैकी पहिल्या अर्भकाचा गर्भपात झाला. त्याचे वजन केवळ ४५० ग्रॅम असल्यामुळे ते बाळ जीवित राहू शकले नाही. सुदैवाने पहिल्या अर्भकाच्या गर्भपातानंतर प्रसूति वेदना कमी होत गेल्या व पुढे मातेच्या जिद्दीची व डॉक्टरांच्या कौशल्याची खरी परीक्षा सुरू झाली. त्या दाम्पत्याने हे गरोदरपण पुढे नेता यावे यासाठी डॉक्टरांशी चर्चा केली. या महिलेस गरोदरपणातील मधुमेहाचे निदान झाले होते. त्यासाठी तिला इन्सुलिनची इंजेक्शन सुरू होती. अशा परिस्थितीत गर्भपातानंतर होणारा जंतुसंसर्ग त्याचप्रमाणे रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये होऊ शकणारा बिघाड या व अशा अनेक धोक्यांची शक्यता होती.अशा बिकट प्रसंगांमध्ये दररोज बारकाव्यांनी तपासणी, जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी औषधोपचार, रक्ताच्या विविध तपासण्या अशा वैद्यकीय शास्त्रामधील प्रगत उपचारांचे सहाय्य घेऊन गरोदरपणातील एक एक दिवस पुढे नेण्यामध्ये डॉक्टरांना यश येत होते.
या सर्व काळामध्ये गर्भाशयातील बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही, याचा बारकाव्याने अभ्यास सोनोग्राफीच्या मदतीने करण्यात येत होता. पुढे जाणारा प्रत्येक दिवस गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. असे करत ११५ दिवसांनंतर या मातेच्या गरोदरपणाने नवव्या महिन्यामध्ये प्रवेश केला रक्तदाब वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे प्रसूति करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. गर्भाशयातील बाळाची स्थिती पायाळू असल्यामुळे रोजी सिझेरियनद्वारे २१०० ग्रॅमच्या निरोगी बालकाचा जन्म झाला. ही शस्त्रक्रिया करणेदेखील अतिशय जोखमीचे होते. अशावेळी अतिरिक्त रक्तस्त्राव होणे, हृदयक्रियेवर परिणाम होणे, पुन्हा जंतुसंसर्ग होणे अशा अनेक गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. सर्व उपचारांचे अतिसूक्ष्म नियोजन केल्यामुळे शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडली. या दिव्यातून जन्मलेले बाळ आता सात महिन्यांचे असून त्याच्या वयाला साजेसा विकास होत असून त्याची प्रगती उत्तम आहे. वैद्यकीय शास्त्रामध्ये अशा प्रकारची घटना अत्यंत दुर्मीळ मानली जाते. जुळ्यांच्या गरोदरपणामधील गर्भपाताच्या जवळपास घटनांमध्ये पहिल्या अर्भकाचा गर्भपात झाल्यावर तीस मिनिटांच्या आतच दुसन्या अर्भकाचादेखील गर्भपात होतो. संपूर्ण जगामध्ये पहिल्या बाळाच्या गर्भपातानंतर गरोदरपण पुढे सुरळीत गेल्याच्या आणि बाळाचा जन्म झाल्याच्या फक्त १४५ दुर्मीळ घटनांची नोंद वैद्यकीय शास्त्रामध्ये 2009 मध्ये घेतलेल्या आढाव्यात आढळून आली.
या आदी पोलंड येथील डॉक्टरअँडामव्हिक्त या स्त्री रोग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या अर्धकाचा गर्भपाता नंतर तब्बल 126 दिवस गर्भ टिकवून निरोगी बाळाचा जन्म झाल्याची नोंद जानेवारी 2004 मध्ये झाली आहे. पत्की हॉस्पिटलमध्ये या सर्व उपचारांमध्ये स्त्रीरोग व प्रस्तुती तज्ञ डॉक्टर सतीश पत्की डॉक्टर, उज्वला पत्की डॉक्टर ,डॉ. सुहृद पत्की, डॉक्टर आदिती कुंटे, डॉक्टर श्वेता कुलकर्णी आयसीयू उपचारांमध्ये विशेषतज्ञ असलेले डॉक्टर श्री स्वरूप कुलकर्णी तसेच पत्की हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर आणि नर्सेस यांचा सहभाग होता.सोनोग्राफी तज्ञ डॉक्टर पल्लवी पाटील व बालरोग तज्ञ डॉक्टर विजय माळी यांचे या उपचार प्रक्रियेत मोलाचे सहकार्य लाभले.
*सर्वोत्कृष्ट संशोधनातील पुरस्कार* पत्की हॉस्पिटलच्या डॉक्टर सुहृद पत्की व सहकाऱ्यांचे हे संशोधनात्मक कार्य ॲक्टा सायंटिफिक वूमन हेल्थ या आंतरराष्ट्रीय नियतकालिका मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे या संशोधनास डिसेंबर 2022 च्या अंकातील सर्वोत्कृष्ट संशोधनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे.
