मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची २८ मे रोजी गांधी मैदान येथे सभा

कोल्हापूर :शिंदे-फडणवीस सरकारकडून शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजना गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ठ आहे. या अभियातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये २८ मे रोजी कोल्हापुरातील गांधी मैदान येथे सभा होणार आहे अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

गांधी मैदानात सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे.  मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भात शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या दौऱ्यासंदर्भात माहिती देताना क्षीरसागर यांनी, राज्य  सरकारच्यावतीने संपूर्ण राज्यात शासन आपल्या दारी अभियान राबविले जाणार आहे.  याकामी कोल्हापूर जिल्ह्यात शिवदूतांची नेमणुकीचे काम अंतिम टप्प्यात असून, शिवदूत आणि शासन यांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचविल्या जाणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातून ७५ हजार पेक्षा जास्त नागरिकांना या अभियानातून लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री  शिंदे आणि उपमुख्यमंत्री  फडणवीस यांची २८ मे २०२३ रोजी महात्मा गांधी मैदान येथे  सभा होणार आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने क्षीरसागर यांनी खासदार संजय मंडलिक, खासदार  धैर्यशील माने, कृषी संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारूगले, उत्तर शहरप्रमुख रणजीत जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे,  प्रा.शिवाजीराव पाटील, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, संजय संकपाळ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे जल्लोषी स्वागत होणार : क्षीरसागर

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री  शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना – भाजप महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक मुख्यमंत्री  शिंदे यांचे जल्लोषी स्वागत करण्यास सज्ज असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.

🤙 8080365706